सायन रुग्णालयात स्वच्छतेचे तीन तेरा

सायन रुग्णालयात स्वच्छतेचे तीन तेरा

सायन रुग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा
सीपीडीतून नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईतील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या सायन रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्‍याचे दिसून येत आहे. येथील वॉर्ड नंबर १६ च्या समोर असलेल्या खिडक्या, जिने, कचऱ्याचे डबे, लिफ्ट, तळमजल्यावरील महिला आणि पुरुष स्वच्छतागृह, ओपीडी बिल्डिंगचे जिने अशा ठिकाणी अस्‍वच्छता असून त्‍याचा त्रास रुग्‍णांसह डॉक्‍टरांनाही सहन करावा लागत आहे. याबाबत रुग्‍णालय प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्याने ही समस्‍या निर्माण झाली आहे. कंत्राटदार कर्मचारी काम करत नसल्‍याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासनाचे कर्मचारी स्वच्छतेचे काम करत असताना सायन रुग्णालयातील स्वच्छतेचे कौतुक होत होते; मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमरतरता असताना सीपीडी म्हणजेच मध्यवर्ती खरेदी खात्याकडून ठेकेदार कंपनी नियुक्‍त करण्यात आली. त्यानुसार ५० कर्मचारी आणि तीन सुपरवायझर असे मिळून ५३ कंत्राटी कर्मचारी होते. मात्र यापैकी ३० ते ३६ कर्मचारी रुग्णालयात हजेरीपुरतेच येतात; त्यानंतर ते काम करत नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
साफसफाईसाठी येत असलेल्‍या कर्मचारीवर्गाकडे सामान नसते. याबाबत रुग्णालय प्रशासनाने ब्रिस्क या कंत्राटदाराशी पत्रव्यवहार केला; मात्र कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

रुग्‍णालय प्रशासनाचा मनस्‍ताप वाढला
रुग्णालयात एकूण ५१५ कर्मचारी असून ज्या वेळी पदे रिक्त होती; त्या वेळी या ठेकेदार कंपनीची नेमणूक करण्यात आली. सध्या ४२ वॉर्ड, १३ आयसीयू १०० ऑपरेशन टेबल, तीन नवे विभाग आहेत. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्याची सर्व पदेदेखील कंत्राटी पद्धतीने भरली आहेत; मात्र ब्रिस्कचे कंत्राट कायम आहे. कंत्राट असूनही त्‍यांचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने रुग्णालयातील स्वच्छतेचे काम करत नाहीत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा मनस्ताप वाढला असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या अडचणी :
पगार कमी व वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी येत नसल्‍याचे सांगितले जात आहे. त्‍यामुळे येथे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अधिष्ठाते आणि वरिष्ठ अधिकारी यांना सूचना देऊनही मनमानी सुरू आहे. ५३ कर्मचारी वर्गातील ३५ ते ४० कर्मचारीदेखील येत नसल्‍यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष
अनेकदा कंत्राटदाराला लेखी तक्रार करूनदेखील त्याच्याकडून या बाबतीत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देणे वाचत असल्याने कंत्राटदाराचा फायदा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना १४ ते १५ हजार पगार दिला जातो.

येथे आहे घाणीचे साम्राज्य
वॉर्ड नंबर १६ च्या समोर असलेल्या खिडक्या, जिने, कचऱ्याचे डबेदेखील खराब, लिफ्ट, तळमजल्यावरील महिला आणि पुरुष स्वच्छतागृह, ओपीडी बिल्डिंगचे जिने, कचऱ्याने भरलेले डबेदेखील स्वच्छ करण्यास टाळाटाळ होताना दिसते.

सायन रुग्णालयात कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. हे कंत्राटदाराचे कर्मचारी काम करत नसले, तरी त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे. त्यांना फैलावर घेण्याचे काम सुरू असते. सर्वच रुग्णालयात हे कर्मचारी असाच कामचुकारपणा करतात. सायन रुग्णालयात ७,५०० रुग्ण दर दिवशी येतात. कधीकधी समस्या वाढतात. पण, काम नाही केले, तर बिले अडवली जातील.
- मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com