आयडॉलच्या अभ्यासक्रमांचे आजपासून प्रवेश

आयडॉलच्या अभ्यासक्रमांचे आजपासून प्रवेश

मुंबई, ता. १८ : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जुलै सत्राच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश उद्यापासून (ता. १९) सुरू होत आहेत. ३० जूनपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. मागील वर्षी आयडॉलच्या २१ अभ्यासक्रमांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आयडॉलमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार ‘चॉइस बेस्स्ड क्रेडिट सिस्टम’ अर्थात सीबीसीएस सत्र पद्धत सुरू करण्यात आली आहे.

पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स ॲण्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमए-मानसशास्र, एमए (संज्ञापन आणि पत्रकारिता), एमए (जनसंपर्क), एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर (पदविका पीजी डीएफएम) या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होत आहेत. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार असल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


तीन नवीन अभ्यासक्रम
यूजीसीच्या डिस्टन्स एजुकेशन ब्युरोने मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलला या वर्षी तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एमए-मानसशास्र, एमए (संज्ञापन आणि पत्रकारिता), एमए (जनसंपर्क) या तीन अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. एमए मानसशास्त्र अभ्यासक्रमासाठी बीए मानसशास्त्रची; तर एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि एमए जनसंपर्क या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेच्या पदवीची पात्रता आवश्यक असणार आहे.

मानसशास्त्राचे सहा विषय
आयडॉलमध्ये तृतीय वर्ष बीएसाठी मानसशास्त्राचे सहा विषय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी याचे छापील साहित्य उपलब्ध आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आयडॉलला एमएमएस-एमबीए व एमसीए हे अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांसाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे. यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर ही प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com