
शेअरबाजारात तिसरी घसरण
मुंबई, ता. १८ ः आज जागतिक परिस्थिती अनुकूल असली तरी भारतातील काही मोठ्या कंपन्यांच्या संमिश्र निकालांमुळे भारतीय शेअर बाजारांनी सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली. आज सेन्सेक्स १२८.९० अंश, तर निफ्टी ५१.८० अंश घसरला.
इतके दिवस अमेरिकेतील खराब आर्थिक परिस्थितीची भीती सर्वांसमोर होती; मात्र आज अमेरिकेतील आर्थिक स्थितीने जरासे चांगले वळण घेतल्याने जागतिक शेअर बाजारात चांगले वातावरण होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्येही सुरुवात चांगली झाली. मात्र दुपारनंतर पुन्हा नफावसुलीचा रेटा आला आणि शेअर बाजार गडगडले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,४३१.७४ अंशांवर, तर निफ्टी १८,१२९.९५ अंशांवर स्थिरावला. आज आर्थिक क्षेत्र वगळता जवळपास सारीच क्षेत्रे तोट्यात होती. निफ्टी आजही अठरा हजार शंभर ते अठरा हजार तीनशे या पातळ्यांमध्येच फिरत होता. तसेच सेन्सेक्सने आजही ६२ हजारांना गवसणी घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला; मात्र तो तेथे टिकू शकला नाही. निफ्टीमधील डिव्हीज लॅब, अदाणी पोर्ट, आयटीसी आणि स्टेट बँक या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के घसरले; तर सेन्सेक्समधील टायटन, महिंद्र आणि महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचे भाव एक ते दीड टक्का घसरले. सेन्सेक्समधील बजाज फायनान्स, कोटक बँक, एअरटेल, आयसीआयसीआय बँक या शेअरचे भाव वाढले.
...
भारतात आज विक्री झाली असली तरी अमेरिकी आर्थिक स्थितीने चांगले वळण घेतले आहे. भारतीय शेअर बाजारांचा व्होल्टालिटी इंडेक्सदेखील कमी झाल्यामुळे स्थिरता दिसते आहे. त्यामुळे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत.
- विनोद नायर, जिओजित फायनान्स