बाल कल्याण संस्थेतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार :

बाल कल्याण संस्थेतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार :

कर्तृत्वाचा गौरव
बालकल्याण संस्था ही दिव्यांगांसाठी दिव्यदृष्टी!
राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन; आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘एबिलिम्पिक्स’ स्पर्धेत पुण्यातील बालकल्याण संस्थेमधील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. स्पर्धेत भारताने एकूण सात पदके मिळविली. त्यांपैकी तीन पदकांवर बालकल्याण संस्थेने नाव कोरले. संस्थेच्या पदकविजेत्या विद्यार्थ्यांचा आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात यथोचित सत्कार करण्यात आला. बालकल्याण संस्थेचे दिव्यांगासाठीचे काम कौतुकास्पद आहे. बालकल्याण संस्था ही दिव्यांगांसाठी दिव्यदृष्टी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवारही कार्यक्रमास उपस्थित होते.

बालकल्याण संस्थेच्या यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक रमेश बैस यांनी आज राजभवनामध्ये केले. दिव्यांग असूनही त्यावर मोठ्या आत्मविश्वासाने मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले उत्तुंग यश वाखाणण्याजोगे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. फ्रान्समध्ये २२ ते २६ मार्च २०२३ दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘एबिलिम्पिक्स’मध्ये भारतातर्फे एकूण १३ स्पर्धक सहभागी झाले होते. बालकल्याण संस्थेतील चेतन पशिलकर, प्रियांका दबडे, ओंकार देवरूखकर आणि भाग्यश्री नडीमेटला अशा चार विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. भारताने एकूण सात पदकांवर नाव नोंदवले. बालकल्याण संस्थेच्या दोन विद्यार्थिनींनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले. विशेष नैपुण्य पारितोषिकही प्राप्त केले. संस्थेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

२०२३ मध्ये संस्थेचे चार विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले. त्यापूर्वी संस्थेचे सात विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. यंदाच्या स्पर्धेत चेतन पशिलकर याला ‘पेंटिंग’ आणि ‘वेस्ट रि-यूज’साठी सुवर्णपदक मिळाले. चेतनने ‘मास्टर इन फाईन आर्टस्’मध्ये अनेक अवॉर्ड मिळवले आहेत. प्रियांका दबडे हिला भरतकामासाठी रौप्यपदक आणि उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिव्यांग असूनही प्रियांकाने एम्ब्रॉयडरीमध्ये डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग केले आहे. उर्वरित दोन विद्यार्थ्यांपैकी एकाने चौथा आणि एकाने सातवा क्रमांक मिळवला. ओंकार देवरूखकर याने जोस्टर डिझायनिंग अभिनव कला महाविद्यालयातून कमर्शिअल आर्टिस्ट पदवी प्राप्त केली असून डिझानर आर्टिस्ट म्हणून तो काम करत आहे. भाग्यश्री नडीमेटला हिने ‘टेलरिंग बेसिक आर्ट मास्टर’ पदवी मिळवली आहे. ती कर्णबधिर मुलांच्या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस ः पवार
सत्कार सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की बाल कल्याण म्हणजे गेली ४० वर्षे दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असलेली भारतातील एकमेव संस्था आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला-क्रीडा आधारित अभ्यास पद्धतीचा अवलंब संस्थेत होतो. येथे कोणतेही वर्ग नाहीत; परंतु हस्तकला, चित्रकला, गायन, वाद्यवादन, नृत्य, नाट्य, क्रीडा प्रकार, पोहणे, मातीकाम, संगणक इत्यादी उपक्रम राबविले जातात. पुणे जिल्ह्यातील शंभरहून अधिक शाळांमधून विविध दिव्यांगत्व असलेले (दृष्टीबाधित, कर्णबधिर, मतिमंद, स्वमग्ण, बहुविकलांग, सेलेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग इत्यादी) विद्यार्थी संस्थेच्या उपक्रमाचा लाभ पूर्णपणे मोफत घेत आहेत. कला-क्रीडा प्रकारात आता संस्थेच्या ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव मोठे केले आहे. भविष्यात संस्थेतील उपक्रमांमध्ये वाढ करून जास्तीत जास्त दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा मानस आहे.
--
संस्थेच्या सर्व उपक्रमांमधून मुलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. मोबाईल दुरुस्ती, लॉण्ड्री, ज्वेलरी मेकिंग, पेपर बॅग, कापडी बॅग बनवणे, टेलरिंग इत्यादी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आतापर्यंत संस्थेमार्फत ४५० जणांना नोकरी व व्यवसाय मिळाला असून ते स्वबळावर उभे राहिले आहेत. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १५ पेक्षा जास्त व्यक्तींचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झालेला आहे.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, बालकल्याण संस्था

संस्थेची प्रगती
- तीन स्वमग्न विद्यार्थ्यांनी सलग १३ तास पोहण्याच्या ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मधील विक्रमाची नोंद संस्थेच्या नावावर आहे. ‘रामायण ऑन व्हिल्स’ कार्यक्रमातून १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी होते.
- तबला या विषयातील भारतातील प्रथम ब्रेल पुस्तकाची निर्मिती बालकल्याण संस्थेत झाली. आज याच पुस्तकाच्या आधारे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांतील काही दृष्टीबाधित व्यक्ती स्वतःचे तबल्याचे क्लास चालवतात.
- संस्थेच्या सर्व कार्याची दखल घेत २००९ मध्ये तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील पहिली संवेदन उद्यान सेन्सरी गार्डनची निर्मिती संस्थेत झाली आहे.
- महाराष्ट्रातील पहिली लिफ्ट असलेली बस संस्थेने घेतली आहे. मुला-मुलींना संस्थेपर्यंत ने-आण करणे व संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येणे त्यामुळे शक्य होत आहे. संस्थेमधील पोहण्याचा तलाव म्हणजे हॉट वॉटर आहे. अॅक्वाथेरपीच्या दृष्टीने महत्त्वाची सुविधा फक्त संस्थेतच आहे.

बहुआयामी थेरपी सेंटर
संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे यांनी सांगितले, की संस्थेने शासनाच्या मदतीने नुकताच बहुउद्देशीय सभागृह तयार केले आहे. संस्थेच्या ४० व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त एकाच छताखाली बहुआयामी थेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी अॅक्वाट्रेड मिल इत्यादींसारख्या अद्ययावत थेरपी मशीन बालकल्याण संस्थेकडे आहेत. व्हर्च्युअल रिअॅलिटी थेरपी, फिजिओथेरपी, बॅच फ्लॉवर रेमेडीज, एक्स्प्रेशन वॉल, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी, स्वीच थेरपी, आईच शिकवेल आईला इत्यादी उपक्रम थेरपी सेंटरअंतर्गत घेण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com