
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना गुणवत्तेनुसार मिळणार श्रेणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांचे कार्य उत्कृष्टरीत्या चालावे, त्यामधील शैक्षणिक सेवा आणि रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष कृती नियंत्रण व विश्लेषण कक्ष (पीएमएसी) स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे घेण्यात आला आहे. हा कक्ष वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या स्तरावर स्थापन करण्यात येणार असून, हा कक्ष वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करून त्यांना श्रेणी देणार आहे. त्यामुळे यापुढे वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय रुग्णालय, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी निवासी शाखा तसेच प्रशासकीय विभाग हे चार विभाग महत्त्वाचे असतात. शैक्षणिक व रुग्णसेवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या अधिष्ठात्यांकडून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात प्रत्येक महिन्यात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया, उपलब्ध शल्यविशारद, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत मिळणारा निधी, उपलब्ध डॉक्टरांची संख्या, ई-औषधी पोर्टलवरून खरेदी केलेल्या औषधांची आकडेवारी, एकूण खरेदी केलेले औषध, एकूण निधी, उपलब्ध कर्मचारी, डॉक्टर यांची उपस्थिती, एकूण कामाचे दिवस यांचा समावेश आहे. अधिष्ठाता यांनी संस्थास्तरावर संकलित केलेली माहिती पीएमएसी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ई-मेलद्वारे सादर करण्यात येणार आहे. माहिती प्राप्त झाल्यावर पीएमएसी माहितीचे विश्लेषण त्यानुसार प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास श्रेणी प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक श्रेणीनिहाय आढावा घेण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
...
अधिकारी आढावा घेणार
प्रत्येक संस्थेच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेल्या माहितीचा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी पीएमएसीचे सदस्य आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील संबंधित अधिकारी आढावा घेतील. यामध्ये श्रेणीनुसार महाविद्यालयांच्या प्रमुख समस्या, त्याचे निराकरण याबाबत अधिष्ठाता व नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.