रुग्णालय बांधकामांवर नियंत्रणासाठी सुकाणू समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालय बांधकामांवर नियंत्रणासाठी सुकाणू समिती
रुग्णालय बांधकामांवर नियंत्रणासाठी सुकाणू समिती

रुग्णालय बांधकामांवर नियंत्रणासाठी सुकाणू समिती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : महाराष्ट्रातील ‘आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाचे बळकटीकरण’ प्रकल्पांतर्गत राज्य सरकारने काही जिल्ह्यांतील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम, कार्यान्वयन व संलग्नित रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बँकेमार्फत (एडीबी) ५०० मिलियन डॉलर निधी व इतर तांत्रिक मदत घेतली आहे. या निधीचा वापर योग्यरित्या व्हावा, प्रकल्पांतर्गत धोरणात्मक क्षेत्रांमध्ये अपेक्षित परिणाम साध्य करणे, तसेच प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण व्हावा यासाठी शासनस्तरावरील नियंत्रण यंत्रणा म्हणून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्यातील जनतेला वाजवी दरात अतिविशेषोपचार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्रातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाचे बळकटीकरण’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जळगाव, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, अमरावती, गडचिरोली, भंडारा, अंबरनाथ (जि. ठाणे) आदी ठिकाणी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. एडीबीमार्फत ५०० मिलीयन डॉलर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यपदी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (वित्त), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

समितीची कार्यकक्षा
- धोरणात्मक मार्गदर्शन करणे व प्रकल्पाच्या कामकाजावर देखरेख करणे.
- प्रकल्पाचा फलश्रृती साध्य करण्याच्या दृष्टीने प्रगतीचा मागोवा घेणे.
- येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविणे व निर्णय प्रक्रिया सुलभ करणे.
- उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन करणे.
- वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या बांधकामाकरिता निधी वाटपाबाबत सल्ला देणे.