पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गांवर सहा ठिकाणी शौचालये

पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गांवर सहा ठिकाणी शौचालये

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : मुंबई महापालिकेद्वारे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सहा ठिकाणी शौचालय उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही काळ लागणार असून, तोपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार पक्की शौचालये तयार होईपर्यंत तात्पुरती सुविधा पुढील महिनाभरात केली जाणार आहे.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. त्यावर विविध सुविधा देण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे. याचाच एक भाग म्हणून महामार्गावर सार्वजनिक शौचालये उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन्ही महामार्ग मिळून एकूण सहा शौचालये उभारण्यात येणार आहेत.

पूर्व द्रुतगती मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग-३ चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पूर्व उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. २३.५५ किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग उत्तर-दक्षिण धावतो व ठाणे शहराला मुंबईशी जोडतो. हा महामार्ग मुंबईच्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर आदी महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत.

पश्चिम द्रुतगती मार्ग राष्ट्रीय महामार्ग ८चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबईतील पश्चिम उपनगरामधून धावणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हा महामार्ग मुंबईच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे आदी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. २०१४ मध्ये या महामार्गावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलद वाहतुकीसाठी २.२ किलोमीटर लांबीचा ‘सहार उन्नत मार्ग’ बांधण्यात आला.

घोडबंदर रोड, जोगेश्वरी-विक्रोळी, सांताक्रूझ-चेंबूर, वांद्रे-वरळी सागरी महामार्ग हे प्रमुख जोडरस्ते आहेत. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक होते; मात्र या मार्गांवर शौचालयांची सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. हीच बाब लक्षात घेऊन पालिकेकडून शौचालयांची उभारणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com