मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा

भाग्यश्री भुवड ; सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : काही दशकांपूर्वी वृद्धापकाळात हृदयविकाराचा झटका यायचा, आता कोणत्याही वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे. हृदयविकाराचा झटका आता कर्करोगापेक्षाही प्राणघातक झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवरून याचा अंदाज येऊ शकतो. आकडेवारीनुसार, मुंबईत दर ५५ मिनिटांनी एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब, वायूप्रदूषण, धुम्रपान आणि तरुणांची अस्वस्थ जीवनशैली ही हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी आरोग्य विभागाकडे २०२२ मध्ये विविध आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची माहिती मागवली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये विविध आजारांमुळे ९४५३८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी सर्वाधिक मृत्यू हृदय विकाराने झाल्याचे समोर आले आहे. २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ९४७० लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी २६ लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. तर वर्षभरात ९१४५ लोकांचा कर्करोगाने तर ३२८१ जणांचा टीबीने मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मुंबईत हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१९ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ५८५९ लोकांचा मृत्यू झाला तर २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ५५५४ लोकांचा मृत्यू झाला.

तरुणांचा अधिक बळी
लीलावती रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डॉ.पवन कुमार म्हणाले की, तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एक दशकापूर्वी, १ किंवा २ टक्के तरुण गटांमध्ये हृदयविकाराचा झटका आढळून आला होता. पण आता तरुण लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तरुणांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करणे, वायू प्रदूषण, धूम्रपान आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली ही ती वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.

तणाव सर्वात मोठे कारण -
सायन रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डॉ. प्रशांत मिश्रा म्हणाले की, दोन प्रकारचे लोक असतात, एक म्हणजे ते बैठी जीवनशैली जगतात. अपुरी झोप, तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार आणि तणाव ही हृदयविकाराची कारणे आहेत. त्यांनी सांगितले की त्यांच्या बर्‍याच रुग्णांमध्ये नोकरी आणि करिअरशी संबंधित तणाव होता जो हृदयाशी संबंधित आजारांसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतो. दुसर्‍या प्रकारची व्यक्ती जी कोणत्याही देखरेखीशिवाय व्यापक व्यायाम करते जी कधीकधी प्राणघातक ठरते. शरीरातील प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते जर आपण जास्तीचा दबाव टाकला तर त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतात. रात्रीची झोप सर्वात महत्वाची आहे, योगा केल्याने तणावातून मुक्त होण्यास मदत होईल.

२०२२ मधील आकडेवारी
रोग मृत्यू
हृदयविकाराचा झटका - ९४७०
कर्करोग - ९१४५
टीबी- ३२८१
ब्रेन हॅमरेज - २३०४
ब्रेन स्ट्रोक -१८७६
यकृत निकामी - १७१०
मूत्रपिंड निकामी -१५९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com