
आरटीईच्या ३८ हजार ३२२ जागा रिक्त
मुंबई, ता. २२ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची मुदत सोमवारी २२ मे रोजी संपली. या मुदतीनंतर तब्बल ३८ हजार ३२२ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईत अर्ध्याहून अधिक जागांवर प्रवेशच होऊ शकले नसल्याने या रिक्त जागांवरील प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी याबाबत म्हणाले, आरटीई प्रवेशाची ही मुदत संपली असून यापुढे मुदत दिली जाणार नाही. मात्र जी मुले प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांची रिक्त जागांवर निवड करून त्यांना प्रवेश दिले जातील. यासाठी राज्यातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांची योग्य माहिती घेऊन त्यासाठी लवकरच प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
राज्यातील ८ हजार ८२३ खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ८४६ जागांपैकी अखेरच्या मुदतीनंतर ६३ हजार ५२४ जागांवरच प्रवेश पूर्ण होऊ शकले आहेत. तर उर्वरित तब्बल ३८ हजार ३२२ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात मुंबईतील ३३७ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या ५ हजार ६९० जागांपैकी ३ हजार ३३७ जागांवर प्रवेश झाले असून उर्वरित २ हजार ३५३ जागा रिक्त राहिल्या आहेत.
...
माहिती जाहीर करा!
राज्यभरात रिक्त राहिलेल्या ३८ हजार ३२२ जागांपैकी प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलांची प्रवेशासाठी निवड केली जाईल; मात्र त्यासाठी ही प्रतीक्षा यादी आणि शाळांतील प्रवेशाविना राहिलेल्या जागांची माहिती जाहीर करून त्यानंतरच त्यावर प्रवेश केले जावेत, अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे.