
डॉक्टरला मारहाण प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका
मुंबई, ता. २३ : सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दोन आरोपींची पुराव्यातील तांत्रिक त्रुटींमुळे नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे.
शीव रुग्णालयात सेवेत असलेल्या एका डॉक्टरांनी या प्रकरणात तक्रार केली होती. आरोपी तुकाराम शिंदे (६२) यांनी एक अर्ज भरण्याची विनंती डॉक्टरांना रुग्णालयात केली होती. काम आहे असे कारण त्यांनी दिले होते. दुसऱ्या दिवशीदेखील शिंदे यांनी मुलासह पुन्हा त्यांची भेट घेतली. त्यांचा मुलगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्या वेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी डॉक्टरांना कथित धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. सायन पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. सरकारी कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणणे, शांतता भंग करणे, जाणीवपूर्वक मारहाण करणे असे आरोप पोलिसांनी दोघांवर ठेवले. तसेच वैद्यकीय सेवा कायद्याअंतर्गतदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर अनेक तांत्रिक त्रुटी यामध्ये आहेत, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदविले. तसेच घटना घडल्यानंतर तब्बल अकरा तासाने गुन्हा दाखल करण्यात आला तर साक्षीदारांचे जबानी अकरा महिन्यानंतर नोंदविण्यात आली. न्यायालयाने या सर्वांची दखल निकालात घेतली आहे. अभियोग पक्षाने दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये तांत्रिक त्रुटी असून रुग्णालयात घटना घडली तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांनी तपासला नाही. जे साक्षीदार तपासण्यात आले त्यांनी प्रत्यक्ष मारहाण पाहिली नाही, असे सांगितले. तसेच डॉक्टर आणि साक्षीदार यांच्या जबानीमध्ये तफावत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. रुग्णालयात असलेले सीसीटीव्ही फुटेज ही सादर करण्यात आले नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.