
देहविक्री करणे अपराध नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : स्वतःच्या मर्जीने जर कोणी देहविक्री व्यवसाय करत असेल, तर देहविक्री हा अपराध होऊ शकत नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी देहविक्री करणे गुन्हा आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. देहविक्री करणाऱ्या एका चौतीस वर्षीय महिलेने केलेल्या अपील याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला आहे. जर कोणी स्वतःच्या मर्जीने देहविक्री करत असेल, तर तो गुन्हा ठरू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात पूर्व उपनगरात एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी याचिकादार महिलेसह दोन जणांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या महिलेला देवनार येथील नवजीवन सुधारगृहात एक वर्ष ठेवण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते. संबंधित महिला सज्ञान असल्याचे चौकशीमध्ये उघड झाले होते. दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला महिलेने सत्र न्यायालयात आव्हान दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी ही याचिका मंजूर केली आणि दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय रद्दबातल केला. जर याचिकादार महिला सार्वजनिक ठिकाणी देहविक्री करत नसेल, तर तो अपराध होऊ शकत नाही. संबंधित महिला या देशाची सज्ञान नागरिक आहे आणि अनुच्छेद १९ नुसार ती देशभरात कुठेही प्रवास करू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
पोलिसांनी तपास करायला हवा होता की ती सार्वजनिक ठिकाणी देहविक्रय करत होती की नाही. कोणालाही कारण नसता ताब्यात घेता येऊ शकत नाही. संबंधित महिलेला दोन मुले असून त्यांना त्यांच्या आईची गरज आहे, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. मार्चमध्ये दिलेल्या या निकालाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा उल्लेख न्यायालयाने केला आहे. यानुसार वेश्यालय चालवणे आणि जबरदस्ती करून काम करून घेणे गुन्हा आहे. पोलिसांनी एका टीपवरून संबंधित हॉटेलमध्ये छापा टाकला होता आणि काही महिलांची सुटका केली होती.