
जी -२० शिष्टमंडळाचा वडापाव-पाणीपुरीवर ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या जी-२० शिष्टमंडळातील सदस्यांनी मुंबईतील लोकप्रिय व्यंजनावर ताव मारत आस्वाद घेतला. यामध्ये पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा इत्यादी पदार्थांचा यामध्ये समावेश होता. प्रतिनिधींनी भारतीय आणि खास मुंबईकर खानपान, खाद्यसंस्कृतीचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्याबाबतची माहितीदेखील जाणून घेतली.
जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने आज महापालिका मुख्यालयास भेट दिली. पालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. मुख्यालयाची भव्यदिव्य व नेत्रदीपक वास्तुरचना पाहून शिष्टमंडळातील सदस्य भारावून गेले. विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मिती संकटांच्या वेळी करावयाचे प्रतिबंध, उपशमन आदींबाबतची महापालिकेची सज्जता पाहून शिष्टमंडळाने कौतुक केले. आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळातील सदस्यांचे मुख्यालयात स्वागत केले. आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.
...
हेरिटेज वॉक आणि स्वागत समारंभ
शिष्टमंडळाने गटागटाने महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा ‘हेरिटेज वॉक’ केला. मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तुरचना, इतिहास आदींबाबत इत्यंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली. भव्यदिव्य अशा या वास्तुरचनेचे मूळ रूप जपण्यासाठी महापालिकेने आजवर केलेल्या प्रयत्नांचेदेखील पाहुण्यांनी कौतुक केले. सुमारे दोन ते तीन तासांच्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळासाठी महापालिकेच्या वतीने स्वागत समारंभदेखील आयोजित करण्यात आला होता. महापालिकेने केलेल्या आदरातिथ्याने शिष्टमंडळ भारावून गेले.
...
‘हंसध्वनी’ वाजवण्याची फर्माईश
महापालिका मुख्यालयातील कोर्टयार्ड परिसरात पाहुण्यांसाठी खास बासरीवादन ठेवण्यात आले होते. पंडित भूपेंद्र बेलबन्सी या वेळी बासरीवर यमन राग वाजवत असताना पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या रागाचा आनंद घेतला. त्यानंतर लागलीच पाहुण्यांनी बेलबन्सी यांना राग ‘हंसध्वनी’ वाजवण्याची फर्माईश केली. पंडित बेलबन्सी यांनीही त्यांची फर्माईश पूर्ण केली. पाहुण्यांनी अशा प्रकारे भारतीय शास्त्रीय संगीतातील एका रागाची फर्माईश करून एक सुखद धक्का दिल्याची भावना पंडितजींनी या वेळी व्यक्त केली.
..................