दुचाकीस्वाराची निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीस्वाराची निर्दोष मुक्तता
दुचाकीस्वाराची निर्दोष मुक्तता

दुचाकीस्वाराची निर्दोष मुक्तता

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : रस्ता ओलांडताना नियमांचे पालन न करणाऱ्या पादचाऱ्याच्या अपघातासाठी दुचाकीस्वार जबाबदार नाही, असा निकाल दादर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिला असून दुचाकीस्वाराची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
वरळीमध्ये २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकरणात तेवीस वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने सुसाट बाईक चालवून तक्रारदार पादचाऱ्याला धडक दिली आणि यामध्ये त्याला फ्रॅक्चर आणि अन्य गंभीर जखमा झाल्या, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. सकाळच्या वेळी झालेल्या या अपघातानंतर आरोपीने जखमी गोविंद गालवर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर वरळी पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वार रोहन जैनविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र घटना घडली तेव्हा रस्त्यावर वाहनांची गर्दी होती आणि पादचाऱ्यांना जाण्यासाठी जागा नव्हती, असा जबाब उलटतपासणीमध्ये गालचर यांनी दिला होता. तसेच रस्ता ओलांडता येईल, असे वाटून त्यांनी रस्ता ओलांडायचा प्रयत्न केला होता, अशी कबुलीही त्यांनी दिली. महानगर दंडाधिकारी एस. पी. भोसले यांनी या जबाबाची नोंद घेतली. या जबाबावरून स्पष्ट होत आहे की, तक्रारदाराने रस्ता सुरक्षासंबंधित नियमांचे पालन केले नाही, याची कबुली स्वतः दिली आहे. दुचाकीस्वाराने बेदरकारपणे गाडी चालवली, असे सिद्ध होणारे पुरावे अभियोग पक्षाने दाखल केले नाहीत, असेही न्यायालयाने निकालात नोंदवले आणि आरोपीची निर्दोष मुक्तता केली.