एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत
एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : उच्च व तंत्र शिक्षण, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत नुकत्याच (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत जाहीर होणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकी प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. दोन वर्षे कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना मोठा फटका बसला होता. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रवेश प्रक्रिया उशिरा होऊनही प्रवेशात वाढ झाली होती. अभियांत्रिकीच्या १ लाख ४५ हजार २०१ जागा होत्या. त्यापैकी १ लाख ९ हजार ४९९ जागांवर प्रवेश झाले होते. सुमारे ३६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. गेल्या दहा वर्षांतील रिक्त जागांचे प्रमाण हे सर्वात कमी गतवर्षी होते. यंदा परीक्षा मे महिन्यात पूर्ण झाल्या आणि निकाल १२ जूनपर्यंत लागणार असल्याने प्रवेश प्रक्रियाही लवकर सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.