भूमिगत टाकीच्या मदतीने ‘मिलन सब-वे’ पूरमक्त!

भूमिगत टाकीच्या मदतीने ‘मिलन सब-वे’ पूरमक्त!

मुंबई, ता. २४ : सांताक्रूझ पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या मिलन सबवेमध्ये पावसाचे पाणी साचण्याची डोकेदुखी कायम आहे. यंदाच्या पावसाळ्यात तिथे पाणी साचू नये म्हणून पालिका प्रभावी उपाययोजना करणार आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून दोन पंप आणि सोबत एक जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त एका पंपाचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे भूमिगत टाकीमध्ये तब्बल सहा तासांपर्यंतचा पाणीसाठा करून नागरिकांना दिलासा देणे शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुसळधार पावसामध्ये सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचते. त्यावर तोडगा म्हणून वेगवेगळ्या परिसरामध्ये असलेल्या पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांची क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मिलन सब-वे भूमिगत पाणी साठवण टाकीचा एक प्रकल्प त्यांपैकीच एक आहे. मिलन सब-वे एच पूर्व आणि के पूर्व विभागांचा सीमेचा भाग आहे. तो अत्यंत सखल भाग असल्याने तिथे दरवर्षी जोरदार पाऊस पडल्यास पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत होती. पर्जन्य जलवाहिन्या विभागाने त्याची दखल घेत भूमिगत पाणी साठवण टाकी बांधली आहे. सुमारे दोन कोटी लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये सहा तासांपर्यंत पाणी साठवता येणार आहे. सध्या गुरुत्वाकर्षणाने त्या ठिकाणी ८५ टक्के पाणी साठवणे शक्य होत होते. अतिरिक्त १५ टक्के क्षमता उपयोगात येण्यासाठी तिथे ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि दोन पाणी उपसा करणारे तीन हजार क्युबिक मीटर क्षमतेचे पंप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाकीतील पाणी लवकरात लवकर उपसण्यासाठी अतिरिक्त एका पंपाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे भूमिगत टाकीची क्षमता वाढवणे शक्य होईल. अतिरिक्त कामामुळे साधारण सहा तासांपर्यंत पाणी साठवणूक क्षमता शक्य होईल, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.

टाकीतील पाणी थेट नाल्यात
दोन पंप सब-वेच्या ठिकाणी पाणी उपसा करून टाकी पूर्ण क्षमतेने भरेल, असे नियोजन आहे. समुद्राला ओहोटी असताना टाकीतील पाण्याचा उपसा करता यावा म्हणून अतिरिक्त एक पंप बसविण्यात येणार आहे. उपसा केलेले पाणी इर्ला नाला परिसरात सोडण्यात येईल. संपूर्ण व्यवस्थेमुळे जोरदार पावसावेळी सखल भागामध्ये पाणी साचण्यापासून दिलासा मिळून दुसरीकडे टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांचा वापर होईल, असे प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com