बारावीच्या एकूण निकालात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावीच्या एकूण निकालात घट
बारावीच्या एकूण निकालात घट

बारावीच्या एकूण निकालात घट

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाला आज जाहीर झाला. दर वर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानेच निकालात बाजी मारली असून, यंदा राज्याचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला. निकालात मुलींचे वर्चस्वही कायम राहिले आहे. यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा झाल्याने एकीकडे निकालात (२.९७ टक्के) आणि गुणवंतांच्या यादीतही घट झाली; तर दुसरीकडे विज्ञान शाखेच्या निकालात वाढ झाली असून मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी (८८.१३ टक्के) लागला आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी परीक्षा दिलेल्या १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर तब्बल १ लाख ३५ हजार ७२६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात २.९७ टक्के घट झाली असून, यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के लागला; तर मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे. परीक्षेत ९३.७३ टक्के मुली; तर ८९.१४ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना ७३८७४००९७०, ८३०८७५५२४१, ९८३४९५१७५२, ८४२११५०५२८, ९४०४६८२७१६, ९३७३५४६२९९, ८९९९२३२२९, ९३२१३१५९२८, ७३८७६४७९०२, ८७६७७५३०६९ आदी हेल्पलाईनवर संपर्क साधता येणार आहे.

१७ महाविद्यालयांचा ‘भोपळा’
राज्यातील तब्बल दोन हजार ३६९ कनिष्ठ महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे; तर १७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. ५० टक्क्यांहून कमी निकाल लागलेली ३६ महाविद्यालये असून, तीन हजार महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल ९०.०१ ते ९९.९९ टक्के एवढा लागला आहे. हे प्रमाण जवळपास ५० टक्के इतके असल्याने शहरी भागात पदवी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा लागण्याची शक्यता आहे.

मुंबई विभाग यंदाही तळालाच
बारावीच्या परीक्षेचा मुंबई विभागाचा निकाल यंदाही सर्वांत कमी लागला आहे. या विभागात यंदा तीन लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी परीक्षेला तीन लाख २९ हजार ३३७ बसले; तर तब्बल एक हजार ८२४ जणांनी परीक्षेला दांडी मारली. परीक्षेला बसलेल्यांपैकी दोन लाख ९० हजार २५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ८८.१३ टक्के इतका लागला आहे; तर ४० हजार ९०३ विद्यार्थी नापास झाले आहेत. मुंबई विभागात यंदा मुलींनी बाजी मारली आहे. एकूण निकालाच्या ९०.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचे प्रमाण ८६.०६ टक्के आहे. मुंबईत विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९१.१८, कला ८०.८७ आणि विज्ञान शाखेचा ८८.१५ टक्के लागला आहे. तसेच व्यवसाय शिक्षण ९१.५८ आणि आयटीआयचा सर्वाधिक ९४.७७ टक्के निकाल लागला आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण ९६.०१
पुणे ९३.३४
कोल्हापूर ९३.२८
अमरावती ९२.७५
संभाजीनगर ९१.८५
नाशिक ९१.६६
लातूर ९०.३७
नागपूर ९०.३५
मुंबई ८८.१३
--
शाखानिहाय निकाल
विज्ञान ९६.९ टक्के
आयटीआय ९०.८४ टक्के
वाणिज्य ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के
कला - ८४.०५ टक्के