नालेसफाईची आठवड्या आगोदरच उद्दिष्ट्य पूर्ती

नालेसफाईची आठवड्या आगोदरच उद्दिष्ट्य पूर्ती

नालेसफाईची आठवड्याआगोदरच उद्दिष्टपूर्ती
दहा लाख मेट्रिक टन गाळाचा उपसा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : यंदाची नालेसफाई एक आठवडा आधीच झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यापैकी आतापर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. यामुळे पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट दरवर्षी ठरविले जाते. यंदा ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. गाळ काढण्याच्या कामांना ६ मार्चपासून सुरुवात करण्यात आली होता; तर काम पूर्ण करण्याची मुदत दिनांक ३१ मे ठरवली होती. या विहित मुदतीपूर्वीच नाल्‍यातून गाळ काढण्‍याचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.

काम सुरूच राहणार
गाळ काढण्याची सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमण्यात आले होते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. उद्दिष्ट गाठले गेले असले, तरी त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम यापुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे.

नागरिकांना आवाहन
नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी आतापर्यंत वाहनांच्या ५१ हजार ४९० फेऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नालेसफाईवर सीसीटीव्हीची नजर :
गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफीत (व्हिडीओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक केले आहे. काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम संपल्यानंतर अशा तीनही टप्प्यांमध्ये चित्रफीत व छायाचित्रे तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे. असे छायाचित्रण व चित्रफीत तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डम्परमध्ये भरण्यापूर्वी डम्पर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डम्परमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्‍‌या डम्परच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून करून घेण्यात येत आहे.
......
संकेतस्‍थळावर माहिती
छायाचित्रे, व्हिडीओ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर, https://swd.mcgm.gov.in या लिंकवर पाहता येईल. आतापर्यंत १ लाख ५४ हजार ५०० हून अधिक छायाचित्रे, ७२ हजार ३०० पेक्षा अधिक व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
.......
नालेसफाईचा सविस्तर तपशील :
शहर विभाग-
उद्दिष्ट - ३७ हजार ९४६ मेट्रिक टन
गाळ काढला - ३५ हजार ७५६ मेट्रिक टन
प्रमाण - (९४.२३ टक्‍के)

पूर्व उपनगरे
उद्दिष्ट - १ लाख १७ हजार ६९२ मेट्रिक टन
गाळ काढला - १ लाख १९ हजार ३५९ मेट्रिक टन
प्रमाण (१०१.४२ टक्‍के)

पश्चिम उपनगरे
१ लाख ९३ हजार ९३३ मेट्रिक टन
गाळ काढला -१ लाख ९४ हजार ६२२ मेट्रिक टन
प्रमाण - (१००.३६ टक्‍के)
.......
मिठी नदी
उद्दिष्ट्य - २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन
गाळ काढला - १ लाख ९५ हजार ५६६ मेट्रिक टन
प्रमाण ९०.४७ टक्‍के
.......
लहान नाले-
उद्दिष्ट - ३ लाख ६५ हजार ६३३ मेट्रिक टन
गाळ काढला - ३ लाख ८५ हजार ६४४ मेट्रिक टन
प्रमाण १०५.४७ टक्के
......
महामार्गांलगतचे नाले-
उद्दिष्ट - ४८ हजार ५०२ मेट्रिक टन
गाळ काढला - ५३ हजार ९७७ मेट्रिक टन
प्रमाण १११.२९ टक्‍के
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com