‘नायर’मधील दंतचिकित्सा विभाग अद्ययावत होणार

‘नायर’मधील दंतचिकित्सा विभाग अद्ययावत होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : शहरातील नागरिकांच्या तोंडाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग सातत्याने कार्यरत आहे. या विभागामार्फत अधिकाधिक नागरिकांच्या तोंडाच्या विकारांवर उपचार करता यावेत, यासाठी नायर महाविद्यालयाकडून सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग अद्ययावत करण्यात येत आहे. विभागामध्ये आवश्यक यंत्रणा आणण्यात आल्या असून, नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

मौखिक आरोग्याबाबत मुंबईतील झोपडपट्टी भागासह ग्रामीण भागामध्ये जाऊन नायर दंत महाविद्यालयातील डॉक्टर जनजागृती करतात. यासाठी रुग्णालयाकडे असलेल्या दोन मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येतो. या शिबिरामध्ये आढळणाऱ्या व्यक्तींवर व्हॅनमध्ये उपचार केले जातात. ज्या व्यक्तींचे मौखिक आरोग्य अधिक बिघडलेले असते, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून येणारे रुग्ण आणि रुग्णालयात थेट येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्या तुलनेमध्ये नायर दंत महाविद्यालयात फक्त चारच खुर्च्या असल्याने रुग्णांना ताटकळ रहावे लागते.

रुग्णांवर जलद गतीने उपचार व्हावेत आणि त्यांचे विकार दूर व्हावेत यासाठी रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग अद्ययावत करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सध्या रुग्णालयामध्ये असलेल्या चार खुर्च्या वाढवून १७ करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच रुग्णांना अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर मिळावेत यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच विभागाला रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर स्वतंत्र जागा देण्यात आली असल्याची माहिती नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com