
सिकलसेलवर जागरूकतेने मात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : सिकलसेल डिसऑर्डर हा एक अनुवांशिक आजार आहे. राज्यातील १९ हजारांहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराचा प्रतिबंध व व्यवस्थापन याबाबत गुरुवारी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सिकलसेलतज्ज्ञांनी या आजाराबाबत जनजागृतीवर भर दिला. या आजाराबाबतचे सरकारी धोरण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, जागरूकतेमुळे या आजारावर मात करता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑर्गनायझेशन (नेस्को), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी (एनआयआयएच) यांच्या संयुक्त विद्यमाने केईएम रुग्णालयात सिकलसेलवर राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
परिषदेला आयसीएमआर, एनआयआयएच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य, शास्त्रज्ञ आणि सिकलसेल रोगावरील तज्ज्ञ उपस्थित होते. या परिषदेत दोन चर्चा सत्रेही झाली. पहिले चर्चासत्र सिकलसेल रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्वसमावेशक उपचार या विषयावर होते; तर दुसरे प्रौढ आणि सिकलसेल असलेल्या मुलांमध्ये लसीकरणाची भूमिका यावर होते. या दोन्ही चर्चासत्रांत तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी आपले विचार मांडले आणि या आजाराचे इतर परिणाम रोखण्यासाठी औषध आणि लसीकरण प्रभावी असल्याचे सांगितले.
...
जनजागृतीची गरज
सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा जया रामटेके म्हणाल्या की, आज परिषदेत जी काही चर्चा झाली त्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही. या आजाराबाबत शासनाच्या उपाययोजना, उपचार, लसीकरण याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. जनजागृतीच्या माध्यमातून आपण या आजारावर मात करू शकू.
...
लवकर तपासणी आवश्यक
एनआयआयएचच्या वरिष्ठ उपसंचालक डॉ. अनिता नाडकर्णी यांनी सांगितले की, आज या आजाराचा सामना करण्यासाठी लवकर तपासणी करणे आवश्यक आहे. या स्क्रीनिंगबाबत तरुणांमध्ये जनजागृतीचा परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच जन्मपूर्व तपासणीचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
...
लग्नापूर्वी चाचणी
नेस्कोचे सचिव गौतम डोंगरे म्हणाले की, आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. एक, विवाहापूर्वी जोडप्याने सिकलसेल आजाराची तपासणी करावी आणि दुसरी, सिकलसेलग्रस्त व्यक्ती चांगले जीवन जगू शकतात, यासाठी धोरण तयार केले असले, तरी महाराष्ट्रात त्याबाबत जनजागृती व्हावी. त्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती.