
सॅम डीसुझाला दिलासा देण्यास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : अभिनेता शाहरूख खानच्या मुलाशी संबंधित कार्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या सॅम डीसुझाला आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सॅमने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सीबीआयने ठेवला.
एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंवरील लाचखोरीच्या प्रकरणात सॅमवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेने सॅमने उच्च न्यायालयात याचिका केली होती. सीबीआयचा गुन्हा आणि अटकेपासून संरक्षण, अशा दोन मागण्या त्याने केल्या. सुट्टीकालीन न्यायालयात न्या. अभय आहुजा आणि न्या. मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने यामध्ये संरक्षण देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर सॅमच्या वतीने ॲड. पंकज जाधव यांनी याचिका मागे घेतली. या प्रकरणातील के. पी. गोसावी आणि शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यामध्ये सॅमने व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सिंह यांच्यावर आरोप
सॅमने याचिकेत एनसीबीचे तत्कालीन उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. २०२१ च्या एका प्रकरणात सॅमला समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी सिंह यांना एका प्रकरणात नऊ लाख रुपये दिले, असा उल्लेख याचिकेत केला आहे. तसेच अन्य एक अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांना पाच लाख रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
सत्र न्यायालयात अर्ज?
सीबीआयने सॅमला चौकशीसाठी समन्स बजावले आहेत; मात्र त्याने अद्याप हजेरी लावली नाही आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने मागणी नामंजूर केल्यामुळे त्याला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागेल. वानखेडेंना या प्रकरणात उच्च न्यायालयाने ८ जूनपर्यंत दिलासा दिला आहे. आर्यनला सोडण्यासाठी शाहरूखकडून २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे.