
विनयभंगप्रकरणी युवकाला दोन महिने कारावास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पेरू देशातील महिलेचा विनयभंग केल्याच्या खटल्याचा निकाल दोन महिन्यांत जाहीर करत माझगाव न्यायालयाने आरोपीला दोषी घोषित करून दोन महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. भायखळा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पेरूची नागरिक असलेली पर्यटक महिला येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहात होती. या गेस्ट हाऊसमध्ये आरोपी रियाज अहमद कामाला होता. मार्च महिन्यात महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. संबंधित महिला एकटी आहे असे माहीत असूनही त्याने वारंवार तिच्याशी बोलण्याचा आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने केला होता. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली; मात्र पीडितेला केवळ स्पॅनिश भाषा येत असल्याने पोलिसांना संवाद साधण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी भाषांतरकाराची मदत घ्यावी लागली. तसेच कागदपत्रे अनुवादित करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतली. विशेष म्हणजे २४ तासांत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि माझगाव न्यायालयाने दोन महिने खटल्यावर सुनावणी घेतली.