
बीएएमएस, बीयूएमएसच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई, ता. २७ ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच जाहीर केलेल्या बीएएमएस आणि बीयुएमएस अभ्यासक्रमांच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्या आहेत. त्यासाठीची घोषणा आज विद्यापीठाकडून करण्यात आली.
अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनने (एनसीआयएसएम) शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केली. यानुसार बीएएमएस आणि बीयुएमएस या परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात याव्यात, असे म्हटले होते. त्यामुळे बीएएमएस आणि बीयुएमएस अभ्यासक्रमांच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात आल्या असून त्यासाठीचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ च्या पदवी, पदव्युत्तर आणि विद्यापीठ अभ्यासक्रमांचे सविस्तर वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत त्या पुढे ढकलण्याची मागणी केली होती.