
पुदुमजी पेपर्सला ७५८ कोटी रुपये महसूल
मुंबई, ता. २८ ः खाद्यपदार्थ, मिठाया, औषधे आदी वस्तूंच्या पॅकिंगसाठी विशेष कागदाची निर्मिती करणाऱ्या पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्सला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ७५८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच, त्यांना ७९ कोटी रुपयांचा करपूर्व नफाही झाला आहे. त्यांच्या यावर्षीच्या उलाढालीत मागील वर्षीच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली असून करपूर्व नफाही ७३ टक्के वाढला आहे.
या आर्थिक वर्षात त्यांनी ५७,८२५ मॅट्रिक टन विशेष कागदाचे उत्पादन केले असून मागील वर्षी त्यांनी ५०,४२० मेट्रिक टन उत्पादन केले होते. सध्या कंपनीतर्फे त्यांच्या उत्पादन क्षमतेच्या ८० टक्के क्षमतेचा वापर केला जात आहे. सध्या मंदी आणि चलनवाढीची भीती असलेली भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली, की आमचे उत्पादनही शंभर टक्के क्षमतेने सुरू होईल, अशी खात्री कंपनीने व्यक्त केली आहे.