खैरानी रस्ता येथील जलवाहिनीचे काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खैरानी रस्ता येथील जलवाहिनीचे काम पूर्ण
खैरानी रस्ता येथील जलवाहिनीचे काम पूर्ण

खैरानी रस्ता येथील जलवाहिनीचे काम पूर्ण

sakal_logo
By

खैरानी रस्ता येथील जलवाहिनीचे काम पूर्ण
अत्याधुनिक ‘सीआयपीपी’ तंत्रज्ञानाचा वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः पूर्व उपनगरात एल विभाग हद्दीत खैरानी रस्ता येथे असलेली सुमारे ८०० मीटर लांब जलवाहिनी ही अत्याधुनिक ‘सीआयपीपी’ तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्त करण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. अरुंद जागेत असलेली ही जलवाहिनी टप्प्याटप्याने दुरुस्त केल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवता आला, सोबतच मजबुतीकरण झाल्याने आता या जलवाहिनीची क्षमता आणि आयुर्मानदेखील वाढले आहे.
खैरानी रस्ता येथे सुमारे ३० वर्षांपासून असलेल्या भूमिगत १,२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला (असल्फा आऊटलेट) मागील काही दिवसांपासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. खैरानी रस्ता परिसर अतिशय अरुंद आणि वाहतुकीची वर्दळ असलेला आहे. एवढेच नव्हे, तर एल विभागात संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण रस्ता, जोश नगर, आजाद मार्केट यासह अनेक परिसराला या जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. अशा स्थितीत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सलग हाती घेणेदेखील शक्य नव्हते. त्यातून परिसरातील रहिवाशांची प्रचंड गैरसाय झाली असती.
या कामासाठी जलअभियंता विभागाने सीआयपीपी यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे निश्चित केले. उप जलअभियंता (परिरक्षण) उपविभागाने खैरानी रस्ता जलवाहिनीवरून दर शनिवारी याप्रमाणे दहा आठवडे शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवून टप्प्याटप्प्याने जलवाहिनी दुरुस्ती काम हाती घेतले. अखेर शनिवार (ता. २७) हे काम पूर्ण झाले. उप जलअभियंता (परिरक्षण) विभागातील कुशल अभि‍यंता आणि कामगारांनी प्रत्येक शनिवारी सुमारे ८० मीटर लांब जलवाहिनीचे पुनर्वसन, मजबुतीकरणाचे काम केले. अशाप्रकारे सलग दहा शनिवारी काम करून संपूर्ण ८०० मीटर मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आता या भागातील पाणीपुरवठा सुरळीत असून, नागरिकांची कोणतीही गैरसोय न करता ही मोहीम पूर्ण करण्यात आली.