सबळ कारण नसल्याने विद्यार्थ्याची याचिका फेटाळली

सबळ कारण नसल्याने विद्यार्थ्याची याचिका फेटाळली

मुंबई, ता. २९ : नेटवर्क नसल्याच्या तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने जेईईचा अर्ज भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. याचिकादार अर्ज का भरू शकला नाही याचे सबळ कारण त्याने दिलेले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि याचिका नामंजूर केली.

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे जेईईचे अर्ज ऑनलाईन दाखल करायचे होते. नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे अर्ज दाखल करू शकलो नाही, असे कारण याचिकादार विद्यार्थ्याने याचिकेत दिले होते. ४ जून रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रासाठी उपस्थित राहण्याची परवानगी त्याने मागितली होती. सुट्टीकालीन न्यायालयात न्या. अभय आहुजा आणि न्या. मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. मी ग्रामीण भागात राहतो आणि तिथे नेहमीच वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे मला ऑनलाईन पद्धतीने वेळेत अर्ज भरता आला नाही, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला. आयआयटीच्या संलग्न प्रवेश मंडळाच्या वतीने मात्र त्याच्या दाव्याचे खंडन केले. उपलब्ध माहितीनुसार याचिकादार विद्यार्थ्याने अर्ज दाखल करण्याचा पहिला प्रयत्न मुदत संपल्यानंतर केला असे आढळले आहे. त्यामुळे त्याला कोणताही दिलासा देऊ नये, असा युक्तिवाद मंडळाच्या वतीने करण्यात आला. खंडपीठाने हा खुलासा मान्य केला. प्रवेश प्रक्रियेच्या या टप्प्यावर कोणताही दिलासा देऊ शकत नाही. त्यामुळे अन्य हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बाधित होऊ शकते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. या निकालाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली आहे.

शिस्तबद्ध नियोजनाचा अभाव
आयआयटी, एनआयटी इत्यादी संस्था देशाचे तांत्रिक शिक्षण घडवणाऱ्या केंद्रीय संस्था आहेत. त्यासाठी उत्तम गुणवंत विद्यार्थी मिळण्याकरिता शिस्तबद्ध नियोजन आवश्यक आहे. मंडळाने ७ मेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. अर्ज का भरू शकला नाही याचे सबळ कारण याचिकादाराने दिलेले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि याचिका नामंजूर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com