आधार कार्ड पडताळणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार कार्ड पडताळणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ
आधार कार्ड पडताळणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

आधार कार्ड पडताळणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : राज्यातील अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी वेळोवेळी सूचना देऊनही टाळाटाळ केली जात आहे. परिणामी तब्बल १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती जुळत नसल्याने शालेय शिक्षण विभागाने त्याच्या पडताळणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या एका बैठकीत त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. १५ जूनपर्यंत‍ आधार कार्ड पडताळणी करण्यासाठी शाळांना मुदत दिली जाईल. त्यानंतरच आधार कार्ड पडताळणीनुसार संचमान्यता केली जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत आधार कार्ड पडताळणीसाठी टाळाटाळ करणाऱ्या शाळांना पळवाटा शोधणे अवघड होणार असल्याचे सांगितले जात आहे. ‍
शिक्षण विभागाकडून ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आधार प्रमाणित विद्यार्थी गृहीत धरले जाणार आहेत. त्याच माध्यमातून संचमान्यता केली जाणार आहे; मात्र ज्या आधार कार्डमध्ये तफावती आढळून आल्या आहेत, त्यांची माहितीही संचमान्यतेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याने यासंदर्भात काही तफावती आढळल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहानिशा करून निर्णय घ्यावा; मात्र त्यासाठीची सर्व प्रकरणे आयुक्तांच्या निदर्शनास आणावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पडताळणीनुसारच संचमान्यता
राज्यातील शाळांना आधार कार्ड पडताळणी करून घेण्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही तब्बल १३ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुळत नव्हते. तब्बल तीन लाख ९१ हजार विद्यार्थी आधाराविना असल्याची माहिती समोर आली होती. आता सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी १५ जूनपर्यंतच मुदत देण्यात आली असून त्यानंतर शाळांना कोणतीही संधी दिली जाणार नाही. थेट संचमान्यता केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.