
ग्रामीण भागात मासिक पाळीचे धडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : लैंगिक संबंधाइतकाच ‘मासिक पाळी’ हा महत्त्वाचा विषय असूनही आजही निषिद्ध मानला जातो. याबाबत चार लोकांत बोलणे हेतूपूर्वक टाळतात. यामुळे या दिवसांचे महत्त्व लक्षात घेता जे. जे. परिचर्या महाविद्यालयाने पुढाकार घेत मासिक पाळी जनजागृती अभियान आदिवासी पाड्यांवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम मासिक पाळी दिवसापुरता मर्यादित न ठेवता जनजागृती चळवळ करण्याचा मानस असल्याचे परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्पणा संख्ये यांनी सांगितले.
अलीकडची तरुण पिढी खुल्या विचारांची असल्यामुळे साहजिक ते मासिक पाळीच्या विषयी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त होतात. असे असले तरी बहुतांश घरांतील वातावरण वेगळे असल्याने या विषयावर अनेक जण बोलणे टाळतात. या कारणामुळे बहुतांश स्त्रियांना दर महिन्याला नियमितपणे पाळी येत असूनही याबद्दल त्यांना फार कमी माहिती असते. मासिक पाळीत महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. या वेळी स्वच्छतेकडे थोडेसे जरी दुर्लक्ष केल्यास जीवघेणे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळेच पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असते, असे ज्येष्ठ परिचारिका हेमलता गजबे व सुनीता चांदूरकर यांनी सांगितले.