
लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षकाला सक्तमजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : सहलीला गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या क्रीडा शिक्षकाला विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी जाहीर करून पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. महापालिका शाळेत शिक्षक असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. विद्यार्थिनींना लगोरी या पारंपरिक खेळाबरोबर कुस्ती आणि कबड्डीचे प्रशिक्षण आरोपी शिक्षक देत होता. आरोपीने लगोरी सामन्यांसाठी मुलींना अलिबागमध्ये नेले होते; मात्र तेथील वर्तन पाहून विद्यार्थिनींनी २०१६ मध्ये शिक्षकाची तक्रार केली, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. प्रशिक्षण देताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि बोलणे असे आरोप त्याच्याविरोधात ठेवण्यात आले होते. विशेष न्या. एस. सी. जाधव यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावत १० हजार रुपये दंडही ठोठावला आहे.