पदवीचे प्रवेश वादाच्या भोवऱ्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवीचे प्रवेश वादाच्या भोवऱ्यात!
पदवीचे प्रवेश वादाच्या भोवऱ्यात!

पदवीचे प्रवेश वादाच्या भोवऱ्यात!

sakal_logo
By

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : राज्यात आगामी शैक्षणिक सत्रापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चार वर्षांच्या पदवीचे प्रवेश सुरू झाले आहेत; मात्र चार वर्षांसाठी आवश्यक असलेल्या शाखानिहाय अभ्यासक्रम आणि त्या विषयांचे क्रेडिट यासाठीचे विषयनिहाय बास्केट एकाही विद्यापीठात तयार नाहीत. त्यामुळे सुरू असलेले पदवीचे प्रवेश वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम हा चार वर्षांचा करण्यात आला आहे. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने धोरणाला मान्यता देऊन राज्य कृती आराखडा जाहीर केला. २० एप्रिलला याबाबतचा शासन निर्णय जारी करून त्यात ३० मेपर्यंत सर्व विद्यापीठांना चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी शाखानिहाय बास्केट जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र मुदतीअखेरपर्यंत एकाही विद्यापीठाने ते जाहीर केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

बारावीच्या निकालानंतर राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये पदवीचे प्रवेश सुरू झाले आहेत; मात्र चार वर्षांच्या पदवीसाठी नेमके कोणते विषय आणि त्यासाठीचे क्रेडिट कसे असतील, याचा कोणताही आराखडा तयार नाही. तरीही प्रवेश सुरू असल्याने शाखानिहाय विषय आणि त्यातील क्रेडिटवरून आगामी काळात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेले आदेशच धाब्यावर ठेवले जात असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.

अंमलबजावणी कक्षाचीही वानवा
राज्यातील बहुतांश विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणासाठी अंमलबजावणी कक्षही स्थापन केलेले नाहीत. मुंबई आणि एसएनडीटी आदी काही विद्यापीठांनी मात्र यात पुढाकार‍ घेतला आहे. याउलट स्वायत्त महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले असून बहुतांश महाविद्यालयांत हे कक्ष स्थापन करण्यात आले नसल्याचे उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

बास्केटसाठी विद्याशाखानिहाय क्रेडिट
मुख्य विषय : ५० क्रेडिट
अल्‍प विषय‍ : १८ ते २० क्रेडिट
जेनेरिक/ओपन इलेक्टिव्ह कोर्स : १० ते १२ क्रेडिट
व्होकेशनल ॲण्ड इन्हान्समेंट कोर्स : १४ ते १६ क्रेडिट
स्किल इन्हान्समेंट कोर्स : ६ क्रेडिट
ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स आणि इंडियन नॉलेज सिस्टम : १४ क्रेडिट

नवीन शैक्षणिक धोरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या २० एप्रिलच्या जीआरनुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि त्याच्या क्रेडिटनिहाय अभ्यासक्रम तात्काळ तयार करावा.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग

राज्यातील काही विद्यापीठांनी क्रेडिट आणि शाखानिहाय अभ्यासक्रमासाठी बास्केट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. स्वायत्त महाविद्यालयेही काम करत आहेत. पहिल्यांदाच हा विषय आल्याने थोडा उशीर होत आहे. अभ्यास मंडळाच्या काही मर्यादाही असल्याने अजून बास्केट सादर झालेले नाहीत. ते लवकर होतील.
- डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, सुकाणू समिती, एनईपी