मुंबईत क्षयरोगाचा विळखा घट्‍टच!

मुंबईत क्षयरोगाचा विळखा घट्‍टच!

सकाळ  वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईसह देश २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची स्थिती त्याविरोधात असल्याचे आकडेवारी सांगते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून त्याचा अंदाज येऊ शकतो. अहवालानुसार, दरवर्षी मुंबईत क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येत बरे होण्याचे प्रमाण मात्र दरवर्षी कमी होत आहे. गेल्या चार वर्षांत टीबीच्या नवीन रुग्णांमध्ये १०८ टक्के वाढ झाली आहे. बरे होण्याच्या प्रमाणात ४० टक्के घट झाली आहे.

मुंबईतील क्षयरोगाचे नवे रुग्ण, होणारे मृत्यू आणि बऱ्या झालेल्या रुग्णांबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते फयाज आलम यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘आरटीआय’द्वारे मागवली होती. त्यांना देण्यात आलेल्या माहितीत मुंबईत दरवर्षी टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना त्या आजारातून उपचार घेत बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, २०१९ मध्ये दररोज सरासरी १४१ टीबीचे रुग्ण आढळून येत होते. कोविड कालावधीत २०२० आणि २०२१ अशा दोन वर्षांत झालेल्या कमी तपासणीमुळे क्षयरोगाचे फारसे रुग्ण आढळले नाहीत. दरम्यान दररोज सरासरी १०४ आणि १३६ रुग्ण आढळले. मात्र, २०२२ मध्ये रुग्णसंख्या वाढली. २०२२ मध्ये दररोज १५३ टीबी रुग्ण आढळले.

कार्यकर्ते फयाज आलम म्हणाले, की टीबी वाढण्याची अनेक कारणे आहेत. वाढते प्रदूषणही क्षयरोगास कारणीभूत ठरते; परंतु महापालिका त्याकडे लक्ष देत नाही. त्याशिवाय अनेक रुग्णांची आर्थिक स्थिती इतकी बिकट आहे की त्यांच्याकडे रुग्णालय किंवा क्षयरोग केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी निधी नाही.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले
२०१९ मध्ये दररोज सरासरी १०८ टीबी रुग्ण आजारातून बरे होत होते. २०२० आणि २०२१ मध्ये कोविड कालावधीत त्याचे प्रमाण आणखी कमी झाले. तेव्हा दररोज सरासरी ८० ते १०५ रुग्ण क्षयरोगाने बरे होत होते. पण, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. २०२२ मध्ये दररोज ६५ टीबी रुग्ण बरे होत असल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो.

टीबी कार्यकर्ता म्हणतात...
क्षयरुग्णांच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते गणेश आचार्य म्हणाले, की क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण कमी होण्यामागे अनेक मुख्य कारणे आहेत. गंभीर क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांवर दीर्घकाळ उपचार चालतात. त्यामुळे अनेक जण औषध घेताना कंटाळतात आणि मध्येच ते सोडून देतात. परिणामी ते आजारातून बरे होत नाहीत. देशाला क्षयरोगापासून मुक्त करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला टीबीची चाचणी वाढवावी लागेल, जी मुंबईत जवळपास अस्तित्वात नाही. कोविडदरम्यान प्रत्येक घरात चाचणीची सुविधा पोहोचली होती. मग टीबीच्या बाबतीत अशी पावले का उचलली जात नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला.

अधिकारी म्हणतात...
महापालिका आरोग्य विभागाच्या संयुक्त कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले, की मुंबईतील टीबीचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे. साध्या टीबीसाठी सहा महिने आणि गंभीर आजारासाठी नऊ महिने किंवा अधिक वेळ लागतो. रुग्णांना औषधासोबत पौष्टिक आहारही दिला जातो. त्यासाठी निक्षय मित्र योजनाही सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच आम्ही टीबी रुग्णांची तपासणीही वाढवली आहे.

वर्ष   नवीन रुग्ण   बरे झालेले रुग्ण टक्केवारी
२०१९ ५१५८७ ३९५४२ ७७
२०२० ३७९४३ २९०६८ ७७
२०२१ ४९५६३ ३८६६९ ७८
२०२२ ५५९६१ २३७७५ ४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com