
बीकेसी, सांताक्रूझ परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : सांताक्रूझ पूर्वेतील टीचर्स कॉलनी स्मशानभूमी नजीकच्या १ हजार २०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या पुनर्वसन आणि मजबुतीकरणाचे काम महापालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे हाती घेण्यात येणार आहे. तसेच हंसबुर्गा रोड पुलाखालील वैतरणा जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीही केली जाणार आहे. या कामांमुळे रविवार (ता. ४) ते गुरुवार (ता. ८) या कालावधीत एच/पूर्व विभागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
रविवार ते गुरुवार जलवाहिनी दुरुस्तीची दोन प्रमुख कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे रविवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते १०.४५ वाजेपर्यंत होईल. सोमवारी आणि मंगळवारी (ता. ५ आणि ६ जून) संपूर्ण एच/पूर्व विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल; तर सोमवार ते गुरुवारी (ता. ८) एच/पूर्व विभागातील भारत नगर, वाल्मिकी नगर, महाराष्ट्र नगर, बीकेसीत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.