वरळीतील ‘डॉल्फिन मनोरा’ कात टाकणार

वरळीतील ‘डॉल्फिन मनोरा’ कात टाकणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : वरळी येथे समुद्रात सुमारे २२ वर्षांपूर्वी उभारलेल्‍या डॉल्फिन मनोऱ्यांचे रूपडे पालटण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या दोन्ही मनोऱ्यांची डागडुजी, रंगरंगोटी केली जाणार असून, सौर सागरी दिव्‍यांचा वापर त्‍यात केला जाणार आहे. त्‍याचबरोबर गंज प्रतिरोधक शिडी आणि कठडेही नव्‍याने लावले जाणार आहेत.

मुंबईचे विशिष्ट भौगोलिक स्थान लक्षात घेऊन तसेच मुसळधार पावसाच्या पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा, यासाठी लव्हग्रोव्ह (वरळी) येथे महापालिकेने उदंचन केंद्रे अर्थात पर्जन्‍यजल उदंचन केंद्रे उभारली आहेत. त्‍यात दोन उदंचन केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचा समावेश आहे. लव्‍हग्रोव्‍ह उदंचन केंद्रातून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्‍त सांडपाणी बाह्य बोगद्यातून ३.५ किलोमीटर लांब वाहिनीद्वारे समुद्रात सोडले जाते. वरळी सागरी बोगद्याचे ठिकाण आणि त्याच्‍या पातमुखाचे स्थान दर्शविण्‍यासाठी बोगद्याच्‍या शेवटी, समुद्राच्या आत दोन मनोरे उभारण्‍यात आले आहेत. त्‍यांना ‘डॉल्फिन टॉवर’ संबोधण्‍यात येते.

समुद्रात तैनात नौदल, खलाशी आणि मच्छीमारांनाही हे मनोरे सातत्याने आणि अखंडपणे दिशादर्शन करतात. तसेच, सागरी बोगदा क्षेत्रापासून दूर राहण्‍याकामी जहाज, नौका आणि सागरी जहाजांना सावधगिरीची सूचना देतात. हे मनोरे उभ्या काँक्रीट स्तंभाच्या संरचनेसह बांधण्‍यात आले आहेत. त्‍यास वरच्या बाजूला पंचकोनासारखा आकार आहे. सुरक्षिततेच्या उद्देशाने वरच्या संरचनेच्या परिघावर कठडे लावलेले आहेत. मनोऱ्याच्‍या वरच्या भागावर चढण्यासाठी आणि पोहोचण्यासाठी एक शिडीदेखील आहे. या डॉल्फिन मनोऱ्यांची दुरुस्‍ती करण्‍याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने त्यांचे रूपडे पालटणार आहे.

सांडपाण्याचे नमुने
मलनिस्‍सारण प्रचालन विभागाचे प्रमुख अभियंता सतीश चव्‍हाण यांच्‍या सूचनेनुसार येथील विविध पर्यावरणपूरक बाबींचे नियोजन व व्‍यवस्‍थापन नियमित करण्‍यात येत आहे. मनोऱ्यांच्‍या नजीकच्‍या परिसरातून दरमहा सांडपाण्याचे नमुने घेतले जातात. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिका प्रयोगशाळेद्वारे त्‍यांची चाचणी केली जाते.

...हे बदल होणार
मनोऱ्यांवर गंज प्रतिरोधक नवीन शिडी उपलब्ध करण्‍यात येणार आहे. कठड्यांची रचना बदलून दोन्ही मनोऱ्यांवरील टेहळणी दिवे/प्रखर दिवे नव्‍याने बसविण्‍यात येणार आहेत. त्‍यासाठी सौर पॅनल आणि बॅटरीचा उपयोग केला जाणार आहे. चोरीच्‍या घटना रोखण्‍यासाठी उघडझाप करणारे फाटक (फ्लॅप गेट) बांधण्‍यात येणार आहेत. तसेच या संरचनांचे रंगकाम केले जाणार आहे. ही सर्व कामे विशेष स्‍वरूपाची असून त्‍यासाठी तज्‍ज्ञांची मदत घेतली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com