पदवीचे प्रवेश जुन्याच अभ्यासक्रमाप्रमाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवीचे प्रवेश जुन्याच अभ्यासक्रमाप्रमाणे
पदवीचे प्रवेश जुन्याच अभ्यासक्रमाप्रमाणे

पदवीचे प्रवेश जुन्याच अभ्यासक्रमाप्रमाणे

sakal_logo
By

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमध्ये पदवीचे प्रवेश सुरू झाले आहेत; मात्र यामध्ये चार वर्षांच्या पदवीसाठी काही अपवाद वगळता एकाही विद्यापीठाने प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम आणि त्याचा आराखडा तयार केला नाही. यामुळे पदवीचे प्रवेश जुन्याच अभ्यासक्रमाच्या आधारावर सुरू असून, विद्यापीठांकडून एनईपीची अंमलबजावणी पायदळी तुडवली जात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

एनईपीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळांनी चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचे आराखडे तयार करून ते पदवी प्रवेशाच्या प्रक्रियेपूर्वीच जाहीर करणे आवश्यक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रवेशासाठी आवश्यक विषयांची निवड करून त्याप्रमाणे प्रवेश निश्चित करणे सोपे झाले असते; मात्र एसएनडीटीसह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदींचा अपवाद वगळता एकाही विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेले पदवीचे प्रवेश एनईपीनुसारच होत आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

...अशी असते प्रक्रिया
विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळे अभ्यासक्रम तयार करतात. त्याला विद्यापीठाच्या विद्या परिषदेमार्फत मान्यता दिली जाते. त्यानंतर अभ्यासक्रम निश्चित होतो; परंतु मुंबई विद्यापीठासह राज्यातील तब्बल चार विद्यापीठांमध्ये सिनेट अस्तित्वात नसून अभ्यास मंडळेही कार्यरत नाहीत. अभ्यास मंडळे असली, तरी त्यांच्याकडून अजूनही पदवीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तयार होऊ शकला नाही.

प्रवेशासाठी जुनेच अभ्यासक्रम
राज्यातील काही अपवाद वगळता प्रत्येक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पदवीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जुनेच अभ्यासक्रम निवडावे लागतात. एकाही विद्यापीठात चार वर्षांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रवेश होत नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील काही विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांची तयारी केली आहे; मात्र ज्यांची शिल्लक आहे, त्यांनी लवकरात लवकर तयारी करून विद्या परिषदेत मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळेल, यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय

एनईपीची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी सध्या सुरू झालेले पदवीचे प्रवेश अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहेत. पदवीचे अभ्यासक्रम, त्यातील विषय याची कोणतीही माहिती विद्यापीठांनी दिलेली नाही. यामुळे या प्रवेशानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
- डॉ. वैभव नरवडे, माजी सिनेट सदस्य