‘जेजे’तील नऊ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे

‘जेजे’तील नऊ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातील नेत्रविभागातील निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी तक्रारी केल्या होत्या. या घटनेने आज वेगळे वळण घेतले. नेत्र विभागातील आठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत, तर डाॅ. पारेख यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दरम्यान, ‘माझ्याकडे एकही राजीनामा आलेला नसून डाॅ. रागिणी पारेख यांनी ३१ मे रोजी १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेचा फक्त अर्ज दिला आहे,’ अशी माहिती जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.
गेली कित्येक वर्षे राज्य मोतीबिंदूमुक्त होण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाविरोधात होत असलेल्या तक्रारी म्हणजे जे. जे. रुग्णालय आणि प्रशासनाची नालस्ती असून ती सहन होत नसल्याने आम्ही राजीनामे देत असल्याचे या नऊ डॉक्टरांचे  म्हणणे आहे. डॉ. रागिणी पारेख, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरंजीतसिंग भट्टी, डॉ. अश्विन बाफना, डॉ. हेमालिनी मेहता, डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, आणि डॉ. सायली लहाने या नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
या नऊ डॉक्टरांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटल्याप्रमाणे, गेली २८ वर्षे नेत्रविभागातील डॉक्टर रात्रंदिवस रुग्णसेवा करत आहेत. त्यामुळे या विभागाचे नाव जगभरात प्रसिद्धीस आले. सहा महिन्यांपूर्वी या विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून नऊ डॉक्टरांचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरू ठेवण्यात आली. दरम्यान, अधिष्ठात्यांकडून मागील वर्षभरात नेत्र विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. उलटपक्षी प्राध्यापकांना वारंवार त्रास देण्यात आला. त्याचसोबत बदनामीदेखील केली गेली. त्यामुळे हे प्राध्यापक मानसिक दबावाखाली आहेत. यातूनच त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी या विभागातील रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. यात अधिष्ठात्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या निवासी डॉक्टरांना भडकवण्याचे काम केले त्या तीन निवासी डॉक्टरांचे पीजी रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच इतर निवासी डॉक्टरांनी बेशिस्त वर्तन केल्याबद्दल कडक समज द्यावी, अशीही मागण्या करण्यात आली आहे.
...
काय आहे हे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वीच जे. जे. रुग्णालयाच्या नेत्र विभागातील निवासी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या संधीचा अभाव, अभ्यासकांचा अभाव, संशोधन कार्याचा अभाव आणि विभागातील निवासी डॉक्टरांना नियमितपणे तोंड द्यावे लागणारे असंसदीय वर्तन यांसारख्या अनेक तक्रारी केल्या होत्या. तसेच एनएमसीच्या निर्देशानुसार विभाग चालवावा, अशी मागणीदेखील करण्यात आली होती. तसेच नेत्रचिकित्सा विभागात निवासी डॉक्टरांवर अन्याय होत असून, अडचणी वाढत असून, या ठिकाणी अशैक्षणिक वातावरण असल्याची तक्रार केली होती. निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्या हुकूमशाहीवर चिंता व्यक्त केली होती. आज हे प्रकरण राजीनामा सत्रापर्यंत पोहोचले.
...
आमच्यावर खोटे आरोप!
ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डाॅ. रागिणी पारेख यांनी सांगितले की, यापुढे जी कार्यवाही आणि चौकशी होईल ती निष्पक्ष व्हावी, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आमच्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचा पुरावाही आमच्याकडे आहे. यासंबंधित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा सुरू आहे.
...
निवासी डॉक्टरांचे आंदोलन
बुधवारी संध्याकाळी तक्रारदार निवासी डॉक्टरांनी जे. जे. रुग्णालय आवारात आंदोलन करत या सर्व प्रकरणाविषयी निषेध व्यक्त केला. निवासी डाॅ. शुभम सोनी यांनी सांगितले की, आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत. नवीन व्यक्तीने पदभार स्वीकारला, तर किमान निवासी डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण मिळेल. म्हणून आम्ही बदल्यांची ही मागणी केली आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com