
वाहन परवाना बाद झाला तरी नुकसान भरपाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : एखाद्या अपघातात जर वाहनचालकाचा परवाना बाद झाला असेल आणि त्याचे नूतनीकरण झाले नसेल तरीही चालकाच्या वारसांना वीमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे. वाहन परवाना बाद झाला याचा अर्थ असा नाही की चालक कुशलतेने गाडी चालवत नव्हता, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या या अपघातातील मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने आयसीआयसीआय लोम्बार्ड वीमा कंपनीला दिले आहेत.
पुण्यात हडपसर येथे राहणाऱ्या आशा बाविस्कर या दुचाकीवरून जात होत्या. त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसून त्यांचा मृत्यु झाला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात मोटार अपघात तक्रार निवारण मंचाच्या निकालाविरोधात याचिका केली होती; मात्र चालकाचा परवाना रद्द झाला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकत नाही, असा निर्णय मंचाच्या वतीने देण्यात आला होता. या विरोधात कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर केली आहे.
न्या. एस. जी. डिगे यांच्या न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली. वीमा कंपनीने विम्याचे हप्ते वसूल केले आहेत. त्यामुळे त्यांनी वारशांना नुकसान भरपाई द्यायला हवी. विमा कंपनीने ही रक्कम नंतर ट्रकचालकाकडून वसूल करावी; मात्र केवळ परवाना बाद झाला म्हणून भरपाई नाकारता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.