
कर्करोगग्रस्तांना मिळणार घराजवळ उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दरवर्षी देशभरातून सुमारे ८० हजारांहून अधिक रुग्ण कर्करोगावरील उपचारांसाठी मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये येतात. या रुग्णांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या रुग्णांना त्यांच्या घराजवळ कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी टाटा रुग्णालयातर्फे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील टाटा रुग्णालय, पंजाबमधील मुल्लानपूर आणि आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज कर्करोग उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे.
नवी मुंबई, मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे ७.५ लाख चौरस फुटांच्या जागेत तीन नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत. या इमारती २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यासाठी जवळपास १२०० कोटी रुपये ‘आयसीआयसीआय फाऊंडेशन’कडून सामाजिक उत्तरदायित्त्व निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याबाबतचा करार शुक्रवारी करण्यात आला. आधुनिक उपकरणे आणि खास मल्टीडिसिप्लिनरी तुकडीच्या मदतीने आँकोलॉजी उपचारांची ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर दर वर्षी किमान २५ हजार नव्या रुग्णांवर आधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. या नव्या इमारती प्रादेशिक पातळीवर उभारल्या जाणार असल्यामुळे रुग्णांना मुंबईपर्यंतचा मोठा प्रवास करण्याची गरज राहाणार नाही.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट घट होईल. तसेच देशातील अधिकाधिक कर्करोग रुग्णांवर उपचार घेणे शक्य होणार आहे. या केंद्रामुळे टाटा मेमोरियलच्या नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि मुल्लानपूरम भागातील रुग्णांना वाजवी रकमेत दर्जेदार व वेळेवर उपचार मिळणे शक्य होईल. कर्करोगावरील आधुनिक पद्धतीचे उपचार घराजवळ उपलब्ध होण्यास यामुळे मदत होणार असल्याचे टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.
एकाच छताखाली सुविधा
नवी मुंबईतील ‘टीएमसी’च्या ॲडव्हान्स्ड केअर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटी आरईसी) येथे रेडिएशन आँकोलॉजी विभाग तयार केला जाणार आहे. या विभागात अत्याधुनिक रेडिओलॉजी सुविधा दिल्या जातील. त्यात सीटी स्कॅनर, एमआरटी, बाहेरगावच्या रुग्णांसाठी खास सुविधा, प्रयोगशाळा, रेडिओथेरपी आदींचा समावेश असेल. एकाच छताखाली या सर्व सुविधा दिल्या जाणार असल्यामुळे निदानातील वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि पर्यायाने दर्जेदार उपचार मिळतील.
दक्षिण आणि उत्तर भारत
पंजाबमधील मुल्लनपूर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्चमध्ये दोन पीडिअट्रिक अँड हेमॅटोलॉजिकल आंकोलॉजी विभाग सुरू केले जाणार आहेत. या केंद्राद्वारे आधुनिक उपकरणे आणि उपचार पद्धती पुरवल्या जातील. ज्यामुळे लहान मुलांमधील कर्करोग तसेच रक्त व त्याच्याशी संबंधित कर्करोगावर उपचार शक्य होतील. ही सेंटर्स देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागासाठी महत्त्वाचे केंद्र बनतील.