शुल्काअभावी कागदपत्रे अडकवणे अयोग्य

शुल्काअभावी कागदपत्रे अडकवणे अयोग्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : वसतिगृहाचे शुल्क जमा केले नाही म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्याची कागदपत्रे महाविद्यालयाने रोखून ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विद्यार्थ्याने १० हजार रुपये जमा करावेत आणि रक्कम जमा केल्यानंतर महाविद्यालयाने त्याची कागदपत्रे परत करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शुल्क न भरल्यामुळे एमबीबीएस विद्यार्थ्याची कागदपत्रे अडकवणे अयोग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

टी. एन. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात याबाबत याचिका केली होती. मागील काही महिन्यांचे शुल्क जमा करणे बाकी असून आर्थिक परिस्थितीमुळे ते अद्याप भरू शकलो नाही, असे विद्यार्थ्याने याचिकेत स्पष्ट केले आहे. ही रक्कम वाढून आता ४४ हजार रुपये झाल्याने महाविद्यालयाने गुणपत्रिका आणि अन्य कागदपत्रे ताब्यात ठेवत ती देण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्याला पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. तसेच ग्रामीण भागात सेवा करण्यासाठीही कागदपत्रांची आवश्यकता आहे. महाविद्यालयाने नियमांना डावलून दंडाची जास्त रक्कम लावली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

न्या. मनीष पितळे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत विद्यार्थ्याने १० हजार रुपये जमा करावे आणि रक्कम जमा केल्यानंतर महाविद्यालयाने त्याची कागदपत्रे परत करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या वतीने महाविद्यालयाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. विद्यार्थ्याने शुल्क आणि दंड न भरल्यामुळे ही कारवाई केली, असे पालिकेकडून सांगण्यात आले. या याचिकेवर पुढील सुनावणी १० जून रोजी निश्चित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com