मुंबईतील वृक्षवल्ली बहरणार :  -पालिका वर्षभरात २५ हजार झाडांची लागवड करणार,

मुंबईतील वृक्षवल्ली बहरणार : -पालिका वर्षभरात २५ हजार झाडांची लागवड करणार,

जागत‍िक पर्यावरण द‍िन विशेष

मुंबईत बहरणार वृक्षवल्ली!
पालिका वर्षभरात सर्व प्रभागांत लावणार २५ हजार झाडे


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : येत्या वर्षभरात मुंबईमध्ये नवीन २५ हजार झाडे लावण्याचा विशेष संकल्प महापाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने केला आहे. सोमवारी (ता. ५) असलेल्या ‘जागत‍िक पर्यावरण द‍िना’च्या न‍िम‍ित्ताने दिवसभरात महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रात दोनशेपेक्षा अध‍िक रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासोबत, वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत.

मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महापाल‍िका सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. यंदाही जागत‍िक पर्यावरण द‍िनान‍िमित्त उद्यान व‍िभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचा एक भाग म्हणून २५ हजार वृक्षलागवडीचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. सोमवारी सर्व २४ विभागांमध्ये प्रात‍िन‍िधीक स्वरूपात दोनशे झाडे लावण्यात येणार आहेत. वर्षभरात मुंबईमध्ये पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्याचा मानस आहे. त्याश‍िवाय नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ इत्यादींसारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही करण्यात येणार आहे. १९७४ पासून जगभरात दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाऊंडेशनकडून ‘जागतिक वृक्ष नगरी’चा अत‍िशय प्रत‍िष्ठेचा पुरस्कार २०२१ आण‍ि २०२२ अशी सलग दोन वर्षे मुंबई महानगराला म‍िळाला आहे.

३३ लाख झाडे देताहेत मुंबईकरांना प्राणवायू
महापाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने आतापर्यंत म‍ियावाकी पद्धतीने चार लाखांपेक्षा अधिक झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे आज मुंबई महानगराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी आणि औद्योग‍िक जमिनी, महानगरातील व‍िव‍िध उद्याने आण‍ि रस्तांभोवती ती बहरलेली आहेत.

उद्यानांमध्ये दाटली ह‍िरवळ
- रोजच्या धावपळीच्या आयुष्यात गुरफटलेल्या मुंबईकरांना गारवा म‍िळावा आणि घराबाहेर पडल्यावर त्यांना शीतल छाया म‍िळावी म्हणून महापाल‍िकेने महानगरात ठ‍िकठ‍िकाणी उद्याने व‍िकसित केली आहेत.
- सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १,०६८ उद्याने आहेत. त्या ठ‍िकाणी बहरलेली वृक्षसंपदा, तेथील ह‍िरवळ आणि पक्ष्यांचा क‍िलब‍िलाट मुंबईकरांना आनंद देऊन जातो.
- १,०६८ ठिकाणांवर उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, पार्क आण‍ि इतर मोकळ्या जागा विकसित करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील वृक्षसंपदेची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी करून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याचे काम वनसंपदा करत आहे. त्यात आणखी भर घालून त्यांची निगा राखण्यासाठी उद्यान विभाग कटिबद्ध आहे. मुंबई शहराला ‘सिटी ऑफ ट्री’ बनवायचे आहे.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com