अकरावी प्रवेश फेरीचे वेळापत्रक

अकरावी प्रवेश फेरीचे वेळापत्रक

मुंबई, ता. ४ : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि नागपूर या पाच महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावीच्या ऑनलाईन केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या (कॅप) प्रवेशफेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले. या‍ फेरीची गुणवत्ता यादी १९ जून रोजी जाहीर होणार आहे. अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासोबतच अल्पसंख्याक कोट्याच्या प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ते प्रवेशही केंद्रीय प्रवेशासोबत समांतर‍ चालणार आहेत.

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ८ जूनपासून दुसऱ्या भागासाठी नोंदणी करून महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येईल; तर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत आपला हा भाग पूर्ण करता येईल. त्यानंतर त्यासाठीची प्रक्रिया बंद होईल. भाग २ साठी १५ जूनपर्यंत अर्ज करता येतील; तर पहिली गुणवत्ता यादी १९ जून रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, दुसरी प्रवेश फेरी २३ जून, तिसरी प्रवेश फेरी १ जुलै, चौथी प्रवेश फेरी १० जुलैला होईल.

१२ जून रोजी भाग- १ बंद होईल. त्यानंतर १३ जून रोजी त्यासाठीची यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत भाग २ साठी अर्ज भरता येतील. १६ जूनपासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यामध्ये दुरुस्तीसाठी मुभा दिली जाईल. अकरावी ऑनलाईन पहिल्या फेरीच्या प्रवेशाची सर्व प्रक्रिया २२ जूनपर्यंत पूर्ण होईल. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना यादरम्यान आपले प्रवेश पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्यानंतर २३ जून रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यापूर्वी पहिल्या प्रवेश फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांची यादी अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
---
केंद्रीय प्रवेशातील जागांची विभागणी
कोटा बिगर अल्पसंख्याक अल्पसंख्याक
केंद्रीय प्रवेश फेरीतील प्रवेश ८५ टक्के ३५ टक्के
संस्थांतर्गत कोटा १० टक्के १० टक्के
व्यवस्थापन कोटा ५ टक्के ५ टक्के
अल्पसंख्याक कोटा लागू नाही ५० टक्के
---
मुंबई महानगर क्षेत्रातील जागांची संख्या
महाविद्यालयांची संख्या - १ हजार २०
दहावीत उत्तीर्ण विद्यार्थी - ३ लाख १३ हजार ८७६
प्रवेशाच्या जागा - ३ लाख ७७ हजार ६९५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com