
पीओपी मूर्तींवर बंदीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी श्री गणेश मूर्तीकला समिती, मुंबई आणि राज्यातील पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शाडू मातीने मूर्ती बनवणारे अनेक मूर्तिकार या वेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि राज्य सरकारने नेमलेल्या तांत्रिक समितीच्या सूचनेनुसार पीओपीच्या गणेशमूर्तींना पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी शाडू मातीतून गणेशमूर्ती निर्माण करणाऱ्या मूर्तिकारांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, तांत्रिक समितीने दिलेल्या सूचनांनुसार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय घ्यावेत, अशी या मूर्तिकारांची मागणी आहे.
राज्य सरकारने नुकतीच गणेशमूर्तींबाबत नियमावली जाहीर केली. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार त्यांनी पीओपीच्या घरगुती गणेशमूर्ती बनवण्यास बंदी घातली आहे; मात्र सार्वजनिक गमेशमूर्तींसाठी ही बंदी नाही. त्यामुळे या मूर्तिकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पीओपी मूर्तीवर तात्काळ बंदी लागू करण्यास त्यांना भाग पाडावे अशी विनंती ठाकरे यांच्याकडे केली.