आयटीआयसाठी यंदा एक लाख ५४ हजार जागा

आयटीआयसाठी यंदा एक लाख ५४ हजार जागा

मुंबई, ता. ५ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील ४१८ शासकीय आणि ५७४ खासगी आयटीआयमध्ये यंदा विविध ट्रेंडसाठी तब्बल एक लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत. त्यात ५३ हजार ६०० जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून लवकरच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.
आयटीआयमध्ये यंदा ८३ विविध प्रकारच्या ट्रेंडसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर इत्यादींसारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील सरकारी आयटीआयमध्ये ९५ हजार ३८० आणि खासगी आयटीआयमध्ये ५९ हजार १२ अशा एकूण एक लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत. त्यांपैकी ५३ हजार ६०० जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी २० हजार ७२, अनुसूचित जमातीसाठी १० हजार ८०८, इतर मागासवर्ग २९ हजार ३३५, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १५ हजार ४३९, विमुक्त जाती ४ हजार ६३१, भटक्या जमाती (ब), (क) व (ड) यासाठी अनुक्रमे ३ हजार ८५९, ५ हजार ४०४ व ३ हजार ८८ एवढ्या जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अल्पसंख्याक उमेदवारांसाठी २ हजार ५४८, दिव्यांग उमेदवारांसाठी ७ हजार ७१९ व खुल्या गटातील उमेदवारांसाठी ६१ हजार ७५६ जागा उपलब्ध आहेत.

प्रवेश क्षमतेत वाढ
२०२३ या वर्षापासून नव्याने २५७ तुकड्यांना डीजीटी (नवी दिल्ली) यांच्याकडून सलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये ५१४० एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंगअंतर्गत नव्याने ३० तुकड्यांना मान्यता मिळाली असल्याने जागांमध्ये वाढ झाली आहे.

नाशिक, पुण्यात नवीन ट्रेंड
२०२३ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर हे दोन ट्रेंड सुरू केले जाणार आहेत. या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांच्याकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडीमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.
--
१२ संस्थांत ड्रोन टेक्निशियन
अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण १२ आयटीआयमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com