
हसन मुश्रीफ यांना २० जूनपर्यंत दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मनी लॉण्डरिंगच्या कथित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना २० जूनपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कोल्हापूरमधील कागल जिल्ह्यातील आमदार असलेले मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणात ईडीने तपास सुरू केला असून, मुश्रीफ यांचे दोन कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. तसेच त्यांच्या अनेक मालमत्तांवर ईडीने छापेही टाकले आहेत.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मुश्रीफ यांची मुले नावेद, आबीद आणि साजीद, पदाधिकारी असलेल्या मालमत्तेबाबत ईडीने संशय व्यक्त केला आहे. आर्थिक उत्पन्न नसताना मोठ्या रकमेची देवाण-घेवाण यामध्ये झाली आहे, असा दावा ईडीने केला आहे. ईडीने दाखल केलेला अहवाल रद्दबातल करण्यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच याबाबत ईडीने त्यांच्या मालमत्तेवर छापा टाकून चौकशीही सुरू केली आहे.