
चक्रीवादळाने पावसाचे आगमन लांबणीवर!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम मान्सूनच्या प्रगतीवर झाला असून यंदाचा मान्सून लांबवणीवर पडून तो एक आठवडा पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून साधारणतः १ जूनपर्यंत भारतात दाखल होतो; पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनचा प्रवास मंदावला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिली.
अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तयार होत असून, त्याचा परिणाम केरळात धडकणाऱ्या मान्सूनवर होत आहे. परिणामी मान्सून नेमका किती लांबेल, हे नेमके सांगणे कठीण असले, तरी अपेक्षेपेक्षा मान्सून उशिरा दाखल होईल, असा अंदाज सुनील कांबळे यांनी व्यक्त केला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचा नेमका प्रवास पाहून अधिक सांगता येईल, असेही कांबळे यांनी सांगितले.
मान्सून अद्याप केरळातच दाखल झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज होता; मात्र अचानक तयार झालेल्या चक्रीवादळामुळे केरळमध्ये अद्यापही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नाही. आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात १५ जूननंतरच मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ७ आणि ८ जूनला विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या भागातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.