
पूर्व उपनगराला यंदा दिलासा
पूर्व उपनगराला यंदा दिलासा
सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही; पालिकेचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः महापालिका क्षेत्रात जोरदार पाऊस आणि भरतीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, पुनर्बांधणी, संरक्षक भिंती बांधणे यांसारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा जलद उपसा करणे शक्य होणार आहे. पूर्व उपनगरातील अतिशय सखल १५ ठिकाणी उपाययोजना पूर्ण झाल्याने या परिसरातील नागरिकांना पावसाचे पाणी साचण्यापासून दिलासा मिळणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
पूर्व उपनगरातील अतिशय सखल अशा नेहरूनगर, कुर्ला पूर्व, शेल कॉलनी मार्ग, टिळकनगर रेल्वे स्थानक, जे. एम. एम. मार्ग, कुर्ला पश्चिम, साकीनाका मेट्रो स्थानक, नोफ्रा गेट, शिवाजीनगर पोलिस स्थानक, दुर्गादेवी चौक, मधुकर तुकाराम कदम मार्ग, हजरत अली चौक, देवनार पेरीफेरी मार्ग, प्रयाग नगर, घाटकोपर पूर्व येथील गरोडिया नगर, राम नारायण नारकर मार्ग, पंतनगर, रमाबाई नगर या भागातील काम पूर्ण झाले आहे.
महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत पूर्व उपनगरांतही मोठ्या स्वरूपात नालेसफाईची कामे करण्यात आली आहेत. यामुळे पूर्व उपनगरांसह संपूर्ण मुंबईत यावर्षी मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते, तेथे पालिकेने केलेल्या कामांमुळे पाण्याचा त्वरित निचरा झालेला दिसेल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले.
नागरिकांना दिलासा
महापालिकेने पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचू नये यासाठी विविध कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे यंदा उपनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले व प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागिरदार यांनी नमूद केले.
ही आहेत ठिकाणे
एल विभाग
ब्राह्मणवाडी नाला, डेअरी मार्ग, टिळक नगर रेल्वे स्थानक परिसरातील शेल कॉलनी मार्ग, कुर्ला पश्चिम येथील जे. एम. एम. मार्ग, खैरानी मार्ग, साकीनाका मेट्रो स्थानक
एम पूर्व
शिवाजीनगर पोलीस स्थानक, नोफ्रा गेट, दुर्गादेवी चौक, मधुकर तुकाराम कदम मार्ग, देवनार पेरीफेरी मार्ग येथील हजरत अली चौक
एम पश्चिम
प्रयाग नगर
एन विभाग
घाटकोपर पूर्व येथील गरोडिया नगर, राम नारायण नारकर मार्ग, इमारत क्रमांक ८१, पंतनगर, डी. बी. पवार चौक, रमाबाई नगर
या कामांची पूर्तता
कुर्ला पूर्व येथील नेहरू नगर नाल्याची पुनर्बांधणी
शेल कॉलनी मार्ग आणि टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरात नाल्याची पुनर्बांधणी
कुर्ला पश्चिम स्थित जे. एम. एम. मार्ग येथे पर्जन्य जलवाहिन्या व मोरी पेटिकांची पुनर्बांधणी
खैरानी मार्ग येथील नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व पुनर्बांधणी
साकीनाका मेट्रो स्थानक येथील नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व पुनर्बांधणी
शिवाजीनगर पोलिस स्थानक परिसरातील जलवाहिन्यांचे खोलीकरण आणि पुनर्बांधणी
नोफ्रा गेट येथील जलवाहिन्यांचे खोलीकर
दुर्गादेवी चौक, एम. टी. कदम मार्ग परिसरातील जलवाहिनी जाळ्यांचे रुंदीकरण व पुनर्बांधणी
हजरत अली चौक आणि देवनार पेरीफेरी मार्ग येथील जलवाहिनी जाळ्यांचे आधुनिकीकरण
प्रयाग नगर येथील नाल्यांचे रूंदीकरण
घाटकोपर पूर्व येथील गरोडिया नगर नाल्याचे, घाटकोपर (पश्चिम) मधील व्ही. पी. एस. मार्ग क्रमांक १७ येथील नाल्यांची पुनर्रचना व पुनर्बांधणी
राम नारायण नारकर मार्ग व ९० फूट मार्ग जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथील नाल्यांची पुनर्बांधणी
घाटकोपर पूर्व परिसरातील पंतनगर भागात जलवाहिन्या व मोरीपेटिकांची पुनर्बांधणी
घाटकोपर पूर्व परिसरातील डी. बी. पवार चौक, रमाबाई नगर जलवाहिन्या व मोरी पेटिकांची कामे पूर्ण झाली आहेत.