दिंडोशीत ठाकरे गट, शिंदे गट आमनेसामने
दिंडोशीत ठाकरे गट,
शिंदे गट आमनेसामने
सुनील प्रभूंपुढे संजय निरुपमांचे आव्हान, वंचित-मनसे कोणाचे गणित बिघडवणार?
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई उपनगरातील वायव्य लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दिंडोशी विधानसभा मतदारसंघात या वेळी ठाकरे गटाचे विद्यमान आमदार सुनील प्रभू हे मैदानात आहेत. त्यांच्यासमोर या वेळी शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार संजय निरुमप यांना मैदानात उतवरले आहे.
मागील निवडणुकीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेली मनसेही मैदानात असून त्यांनी स्थानिक कार्यकर्ते भास्कर परब यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसे कोणाचे गणित बिघडवणार, अशी चर्चा सुरू आहे.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने क्रांती नगर, कुरार व्हिलेज, आप्पा पाडा, पिंपरी पाडा, पठाणवाडी, संतोष नगर, नागरी निवारी आदी भाग येताे. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, हिंदी आणि इतर संमिश्र असे एकूण तीन लाख तीन हजार ६०८ मतदार आहेत. यात सर्वाधिक मराठी आणि त्यानंतर हिंदी भाषिक मतदार आहेत.
मागील दोन निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचे सुनील प्रभू या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण आणि मनसेचे अरूण सुर्वे यांनी आव्हान दिले होते, मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवले होते. यंदा त्यांच्यापुढे महायुतीने शिवसेनेचे संजय निरुपम यांना उभे केले असून त्यांना भाजपसह त्यांच्या इतर घटक पक्षांचा मोठा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. त्यातच स्थानिक नगरसेवक, भाजपच्या विविध आघाड्यांचाही मोठा घटक येथे आहे. त्यातच मनसेने भास्कर परब, वंचितने राजेंद्र ससाणे यांना उमेदवारी दिली आहे, तर बसपासह अनेक स्थानिक पक्ष आणि तब्बल १३ अपक्ष उमेदवारही दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मैदानात असल्याने प्रभू यांच्यासाठी ही निवडणूक मोठी आव्हानांची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाहतूक कोंडी, पुनर्विकासाचे मोठे प्रश्न
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात आप्पा पाडा, जामऋषी नगर, क्रांती नगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. येथील जमिनी या वनखात्याच्या असल्याने त्यावरील विषय प्रलंबित राहिला आहे. या वेळी हा विषय निवडणुकीच्या अजेंड्यावर येण्याची शक्यता आहे, तसेच वाढलेली लोकसंख्या, वाहने आणि इमारतींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

