टीबी रुग्णांच्या बिपाल लसीकरणासाठी नोव्हेंबरपासून लसीकरण
‘बीपाल’ डोससाठी
नोव्हेंबरपासून प्रशिक्षण
क्षयरुग्णांच्या औषधोपचारांचा कालावधी होणार कमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : महानगरात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असून एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरुग्णांवर २० महिन्यांहून अधिक काळ उपचार करावे लागतात. या रुग्णांना आता तीन ते चार औषधांचा ‘बीपाल’ हा कॉम्बो पॅक सहा महिने देण्यात येणार आहे. यासाठीचे डॉक्टरांना नोव्हेंबरपासून मुंबईत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
औषधोपचारांचा कालावधी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच बीपाल या औषधांच्या पॅकला मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञांनी तीन दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. काही वर्षांत मुंबई शहरात क्षयरोगाचे ४५ ते ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी १० टक्के रुग्ण हे मल्टी-ड्रग रेझिस्टंट (एमडीआर)मध्ये असतात. अशा रुग्णांवर क्षयरोगाची काही औषधे काम करत नाहीत. त्यांना २० ते २४ महिने उपचार घ्यावे लागतात. त्यात सहा महिने इंजेक्शन घ्यावे लागते. ‘बीपाल’ने ९० टक्के सकारात्मक परिणाम दिल्यानंतर भारतात या औषधांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
.....
कोणत्या औषधांचा समावेश?
बीपाल हा तीन ते चार गोळ्यांचा डोस आहे. एमडीआर रुग्णांसाठी बीपाल कॉम्बो पॅकमध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रीटोमॅनिड, लाइनझोलिड, बेडाक्विलिन आणि मोक्सीफ्लॉक्सासिन या गोळ्यांचा समावेश आहे. प्री-एक्सडीआर टीबी रुग्णांसाठी औषधांच्या कॉम्बो पॅकमध्ये प्रीटोमॅनिड, लाइनझोलिड आणि बेडाक्विलिन यांचा समावेश आहे.
.....
मुंबईतील दोन रुग्णालयांत १०० रुग्णांवर चाचणी
आयसीएमआरच्या सूचनेनुसार, पालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयातील १०० रुग्णांवर ऑगस्ट २०२१ मध्ये क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. सहा महिने औषध दिल्यानंतर या रुग्णांवर दोन वर्षे विशेष लक्ष ठेवण्यात आले. यातील सर्व रुग्णांत सकारात्मक परिणाम दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

