सीईटी परीक्षेतील पर्सेंटाईलमध्ये गैरप्रकार?
सीईटी परीक्षेतील पर्सेंटाइलमध्ये गैरप्रकार?
खासगी क्लासचालकांचा आरोप सीईटी सेलने फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः राज्य सीईटी सेलकडून मे महिन्यात घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील तात्पुरत्या गुणवत्ता यादीत गैरप्रकार झाल्याचा संशय खासगी क्लासचालकांनी व्यक्त केला आहे. सीईटीमध्ये १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या उमेदवारांचे बारावी परीक्षेतील गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइलमध्ये विसंगती असल्याचा संशय घोणसे मॅथ अकॅडमी आणि नगर येथील सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी तसेच प्रवेश फेऱ्या थांबविण्याची मागणी केली आहे.
बारावीतील गणित, विज्ञान विषयांत अत्यंत कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीत १०० पर्सेंटाइल मिळाल्याने यावर संशय घेण्यात आला. तसेच सीईटीतील पर्सेंटाइल प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्याचा एक व्हिडिओही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्याची सीईटी सेलने तत्काळ दखल घेतली असून, त्यावर स्पष्टीकरण जारी केले आहे. चुकीच्या माहितीवर आधारित व्हिडिओ जारी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
--
दोन्ही परीक्षेत उत्तम गुण
सीईटीच्या तात्पुरत्या यादीत २२ जणांना १०० पर्सेंटाइल मिळाले असून, त्यातील आठ जणांनी कॅप प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. उर्वरित १४ जणांनी आयआयटी, नीटच्या माध्यमातून प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अधिक पर्सेंटाइल मिळवलेले उमेदवार जेईई, सीईटी या दोन्ही परीक्षांमध्ये अव्वल होते. त्यातील काही उमेदवारांना जेईई मेन्समध्ये ९५ पर्सेंटाइल मिळाले आहेत, तर दुसरीकडे सीईटीत कमी पर्सेंटाइल मिळाल्याचे स्पष्टीकरण सीईटी सेलने दिले आहे.
--
सीईटी सेलचे आवाहन
अनेक उमेदवारांना बारावीत कमी गुण असतानाही ते जेईई आणि सीईटीत अधिक गुण मिळवतात. बहुतांश विद्यार्थ्यांचे लक्ष हे बारावीपेक्षा जेईई, सीईटीच्या पर्सेंटाइलवर अधिक असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर शंका उपस्थित करणे अत्यंत निराधार आहे. पालक-विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे होणाऱ्या आरोपांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.