कर्करोगावर आयुर्वेद गुणकारी

कर्करोगावर आयुर्वेद गुणकारी

Published on

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : सर्वात गंभीर आजारांपैकी एक असलेला कर्करोग अनेकांसाठी धोकादायक ठरतो. दरवर्षी असंख्य लोकांची ट्यूमरशी झुंज अपयशी ठरते. मात्र कर्करोगावर आयुर्वेद गुणकारी ठरू शकतो, असा विश्वास संशोधक व्यक्त करतात.
कर्करोगादरम्यान जगण्याचा दर वाढला असला तरीही कर्करोग असल्याची केवळ बातमी चिंताजनक आहे. कारण मानसिक आणि शारीरिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही फटका बसतो. रेडिएशन, केमोथेरपी, शस्त्रक्रियेसारख्या आधुनिक उपचारांमध्ये रुग्ण आणि कुटुंबीय हतबल होतात. पण वरळीच्या पोद्दार रुग्णालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद या केंद्रात हजारो रुग्णांवर आयुर्वेदाने उपचार करण्यात आले असून, अनेकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.
............................
आयुर्वेदाकडे वाढता कल
वर्ष रुग्ण
२०२०-२१ ३६५
२०२१-२२ ५७४
२०२२-२३ ७०७
२०२३-२४ ८७५
२०२४-२५ १,०८४
एकूण रुग्ण - ३,६०५
..........................................
दुष्परिणामांची तीव्रता कमी
कर्करोगावरील उपचार घेताना यासाठी रुग्णांना केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी दिली जाते. थेरपीचे दुष्परिणाम होतात. जसे भूक मंदावणे, पोट बिघडणे, केस गळणे, स्नायू कमकुवत होणे, उलट्या होणे यावर आयुर्वेदिक उपचार महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्करोगाच्या ॲलोपॅथी उपचारांदरम्यान आयुर्वेदिक उपचारांमुळे केमोथेरपीचा डोस कमी होतो, भूक लागते. उलट्यांची तीव्रता कमी होते, असे संशोधकांचे निरीक्षण आहे.
-------------------------------------
पंचकर्म तंत्रे ः पंचकर्म म्हणजे व्यवस्थापनाच्या पाच पद्धती ही शरीर शुद्ध करण्याची एक पद्धत आहे. त्यात शोधन नावाची स्पष्टीकरण प्रक्रिया असते. शुद्धीकरण, हर्बल औषध आणि तेल मालीश हे सर्व या धोरणाचा भाग आहेत. या सर्व प्रक्रियेतून रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यात वामन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्त मोक्ष यांचा समावेश असतो.
.......................................................
आयुर्वेदाचे पण दुष्परिणाम
आयुर्वेदाचे दुष्परिणाम नाहीत हे वैद्यकीय क्षेत्रातील अर्ध सत्य आहे. अतिरेक केलेल्या प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम असतात. आयुर्वेदाचेही तसेच आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतली तर दुष्परिणाम होतात, असेही डॉ. दिघे यांनी सांगितले.
-------------------------------------------
कोट
आयुर्वेदिक उपचारांमुळे कर्करोगाच्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवता येते. काही रुग्णांना ॲलोपॅथी उपचार नकोसे असतात. त्यामुळे कर्करोग झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार घेतात. ॲलोपॅथीनंतरही काही रुग्ण आयुर्वेदाकडे वळत आहेत.
- डॉ. आर. गोविंद. रेड्डी, प्रभारी सहाय्यक निदेशक (आयु)
......................................
टाटा, ॲक्ट्रेक आणि इतर रुग्णालयांतून रुग्ण इथे येतात. कर्करोगाच्या उपचारांचे दुष्परिणाम कमी होतील. तसेच कर्करोग पुन्हा होऊ नये, या भीतीनेही रुग्ण येतात. कर्करोग रुग्णांसाठी ॲलोपॅथी उपचारांसह आयुर्वेदिक उपचार सुरू केले जातात.
- डॉ. दत्तात्रय दिघे, अनुसंधान अधिकारी (आयु)
.....................................
२०१३मध्ये मला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी झाली होती. २०१८मध्ये मला जिभेचा कर्करोग झाला. तेव्हा रेडिएशन आणि शस्त्रक्रिया झाली होती. मला तोंडात पुन्हा अल्सर झाल्याचे दिसत होते. माझे टाटामध्येही उपचार सुरू असून मी आयुर्वेदिक उपचारही घेत आहे. मला आयुर्वेदाने फरक पडत आहे.
- पदाबाई घोडके, रुग्ण, खारघर
................................................
२०१७मध्ये मला स्तन कर्करोग झाला. शस्त्रक्रिया सावंतवाडीमध्ये झाली. आधी खासगी आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मध्यंतरी उपचार थांबवले होते. आता रुग्णालयात भरती होऊन पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधे घेत आहे.
- मनीषा तेली, रुग्ण, वेंगुर्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com