लोकसहभागातून नद्या, नाले स्वच्छ करणार

लोकसहभागातून नद्या, नाले स्वच्छ करणार

Published on

लोकसहभागातून नद्या, नाले स्वच्छ करणार
वाकोला नाला स्वच्छ करण्यासाठी पालिकेचा प्रायोगिक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : लोकसहभागातून नद्या व नाले कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रायोगिक तत्त्वावर वाकोला नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घेणार असून, त्यानंतर या उपक्रमाचा व्यापक विस्तार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.
ही घोषणा वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये आयोजित ‘मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासाठी समुदाय सहभाग’ या विषयावरील परिमंडळनिहाय भागधारक कार्यशाळेत करण्यात आली. हा उपक्रम महापालिका एच पूर्व विभाग, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यशाळेत कचऱ्याचे वर्गीकरण, जनजागृती, मिठी नदी व वाकोला नाल्याचे प्रदूषण अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.
उपआयुक्त किरण दिघावकर म्हणाले, नद्यांमध्ये व नाल्यांमध्ये जाणारा कचरा थांबवण्यासाठी स्थानिक नागरिक, तज्ज्ञ व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. वाकोला नाल्याच्या प्रायोगिक स्वच्छता मोहिमेनंतर सर्व नाले व नद्या स्वच्छ करण्याचा व्यापक आराखडा राबवला जाईल.
उपआयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे यांनी सांगितले की, यापूर्वी समुद्रकिनारे स्वच्छता व प्लॅस्टिक विभाजन मोहिमा राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर मिठी नदी व वाकोला नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी म्हणजे उगमस्थळीच तो रोखणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘एच पूर्व’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदृला अंडे यांनी सांगितले की, विभागात दररोज सुमारे ३०० टन कचरा संकलित होतो. दाट वस्त्यांमध्ये मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे असून, त्यामुळे मिठी नदी व वाकोला नाल्यांसारख्या ठिकाणी प्रदूषण वाढते. एक दिवस ओला कचरा, दुसऱ्या दिवशी सुका कचरा, तिसऱ्या दिवशी ई-कचरा असे वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत उपआयुक्त परिमंडळ ३ विश्वास मोटे, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पल्लेवाड, डॉ. स्नेहा पळणीटकर (अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था-घनकचरा व्यवस्थापन केंद्र), स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, टाटा समाजविज्ञान संस्थेच्या अमिता भिडे यांसह अनेक स्वयंसेवी संस्था व नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.


हवामान बदलाचे आव्हान
कार्यशाळेत तज्ज्ञांनी हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर लक्ष वेधले. कचरा व्यवस्थापनासाठी माहिती संकलन, मॅपिंग, जास्त कचरा निर्माण होणारी ठिकाणे निश्चित करणे, तसेच सेन्सर, ड्रोन, मोबाईल ॲप्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर अत्याधुनिक प्रक्रिया प्रकल्प उभारणेही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com