महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा निषेध
महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा निषेध
आयएमए संघटनेचा राज्यभरात संताप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे डॉक्टरांवर कामाच्या ठिकाणी असलेला मानसिक आणि प्रशासकीय ताण पुन्हा एकदा उघड झाल्याचे विधान इंडियन मेडिकल असोसिएशनने केले. तसेच ही एक दुर्घटना नसून राज्यात विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील डॉक्टरांना अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या सुविधांसह काम करावे लागत असल्याची नाराजीही आयएमएने व्यक्त केली. याप्रकरणी आयएमएने विविध मागण्या केल्या आहेत.
----
प्रमुख मागण्या
१. संबंधित पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन व न्यायिक चौकशी करावी.
२. डॉक्टरच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी.
३. डॉक्टरांसाठी समुपदेशन, कायदेशीर मदत देणारा कायमस्वरूपी कक्ष स्थापन करावा.
४. सर्व शासकीय रुग्णालयांत नियमित मानसिक तपासणी व समुपदेशन सत्रे घ्यावीत.
५. पारदर्शक, कालबद्ध आणि नैतिक चौकशी प्रक्रिया तयार करावी.
६. डॉक्टरांना निर्भयपणे तक्रार करता यावी, यासाठी संरक्षण नियम लागू करावेत.
७. डॉक्टरांच्या मानसिक व व्यावसायिक समस्यांसाठी नोडल अधिकारी नेमावेत.
८. डॉक्टरांवरील मानसिक छळ व धमक्यांना शिक्षापात्र गुन्हा घोषित करावा.
---
महिला डॉक्टरला त्वरित न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.
- डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
-----
‘डॉक्टर... तुम्ही एकटे नाहीत...’
मार्ड संघटनेचा समुपदेशनासाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर डॉक्टरांवरील वाढता मानसिक ताण, व्यावसायिक दबाव आणि नैराश्याची समस्या ऐरणीवर आली आहे. याबाबत निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने ‘यू आर नॉट अलोन, हेल्प इज हिअर’ हा उपक्रम सुरू केला आहे.
डॉक्टरांना सहानुभूतीपूर्ण मानसिक आधार देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अलीकडच्या काळात अनेक डॉक्टरांना नैराश्य, कामाचा ताण, तसेच कायदेशीर गुंतागुंतीचा सामना करावा लागत असल्याने यातून डॉक्टरांना आधार देण्यात येईल, असे मार्डने म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत असह्य वाटत असल्यास तसेच एकटेपणा जाणवत असल्यास मार्डकडे संपर्क साधा. मार्ड तुम्हाला ऐकण्यासाठी, मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी तत्पर असल्याचे म्हटले आहे.
-----
एसआयटी चौकशीची मागणी
मुंबई, ता. २६ ः फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची विशेष तपास पथक किंवा सीआयडीमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघ, असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन यांनी केली आहे. या तिन्ही संघटनांनी तातडीने कठोर पावले उचलण्याचे मागणी सरकारकडे केली आहे.
असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स संघटनेने मुख्यमंत्री यांना पत्र देत आरोपी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन म्हणजेच फायमा इंडियाने निष्पक्ष आणि कालमर्यादित चौकशीची मागणी केली असून, महिला यांच्या कुटुंबाला मानसिक, आर्थिक आणि कायदेशीर सहाय्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच डॉक्टर्ससाठी स्वतंत्र मानसिक आरोग्य सहाय्य प्रणाली स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय समुदायात अस्वस्थता पसरली असून, तिन्ही संघटनांनी शासनाने तत्काळ कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

